ठाणे स्टेशनवर दररोज १५ हजार लिटर पाणी प्रवाशांच्या पोटात

बाटल्यांमधील पाण्याची वाढती मागणी

दिवसेंदिवस बदलणार्‍या वातावरणामुळे ठाणेकर नागरिक हैराण झाला आहे. त्यातच लोकल (रेल्वे) प्रवासातील गर्दीने अक्षरशः जीव कासावीस होत आहे. स्थानकात उतरल्यावर कधी एकदा थंडगार पाणी पितोय असे होत आहे. यातच ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्‍यांच्या हाती पाण्याची बाटली दिसून येत असून दररोज सुमारे 15 हजार लीटर पाण्याच्या बाटल्यांची विक्री होत आहे. यावरून दिवसाला 15 हजार लीटर पाणी गठकला जातोय असे म्हणायला काही हरकत नाही. याशिवाय मेघदूत या स्टॉल वर हवेतून पाणी तयार करून विक्री केली जाते तेथून ही 300 ते 400 लीटर पाण्याची विक्री होते.

याशिवाय स्थानकात लावलेल्या कुलरमधून पिण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. या वर्षीय अवकाळी पावसाचे आगमनाने उष्णतेत वाढ झालेली आहे. त्यामुळे अंगाला चटके लागण्याबरोबर अंगाची लाहीलाही ही होत आहे. यातून घश्याला चांगली कोरड पडत असल्याने थंडगार पेय आणि पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल जास्त आहे. त्यातच ठाणे हे रेल्वे स्थानक ऐतिहासिक आहे. या स्थानकातून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. येथून मध्य रेल्वेच्या कर्जत-कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि हार्बर वरील ठाणे वाशी- पनवेल असा रेल्वे प्रवासासाठी नागरिकांची ये-जा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यासाठी एकूण 10 रेल्वे फलाट आहे. त्या फलाटांवर एकूण नऊ मोठे स्टॉल आणि दोन छोटे स्टॉल आहेत.

ठाणे स्थानकातील त्या स्टॉल वर दिवसभरात सुमारे 15 हजार पाणी बाटल्यांची विक्री होत आहे. मात्र पाण्याच्या बाटल्यांची अजून आवश्यकता भासत असल्याची माहिती रेल्वे स्टॉल धारकांनी दिली. थंडगार पेय, ज्यूस पिण्यापेक्षा मिनरल पाण्याच्या बाटल्याना पसंती देताना दिसतात. एका स्टॉलवर सरासरी एक हजाराहून अधिक पाण्याच्या बाटल्यांची विक्री होत असल्याचे बोलले जाते. तसेच हवेतून पाणी तयार करणार्‍या मेघदूत चे चार स्टॉल आहेत. येथेही 300 ते 400 लीटर पाण्याच्या बाटल्यांची विक्री होत आहे. शिवाय रेल्वे प्रशासनाने स्थानक कुलर मशीन बसविली आहे. तेथे ही थंडगार पाणी मिळत असून तेथे किती जण पाणी पितात हे सांगता येत नाही. एप्रिलपेक्षा मे महिन्यात पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढलेली आहे. याच स्टॉल वर विक्री होणार्‍या बाटल्यांचा संख्येवरून दररोज 15 हजार लीटर पाण्याची विक्री होत असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.