शहापूरमधील 27 हजार लाभार्थी घरकुलांच्या प्रतीक्षेत

केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून लाभार्थ्यांना घरकुला अभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील पात्र असलेल्या तब्बल 30 हजार घरकुल लाभार्थ्यांपैकी तब्बल 27 हजार लाभार्थी घरकुलांच्या प्रतीक्षेत असून गेल्या तीन वर्षात फक्त तीन हजार लाभार्थ्यांना घरकुले प्राप्त झाली आहेत. केंद्र सरकारच्या संथ गतीने सुरू असलेल्या कारभारामुळे घरकुलाची अपेक्षा बाळगून असलेल्या लाभार्थ्यांचा भ्रमनिरास केला असून लाभार्थ्यांना घरकुलाविना ऊन पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे.

‘मागेल त्याला घर ’ या घोषणेच्या माध्यमातून सर्वांना 2024 पर्यंत घरकुल देण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न होते. त्यानुसार केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2018 मध्ये ’ आवास प्लस या अ‍ॅपद्वारे लाभार्थ्यांचा ऑनलाईन सर्वे करण्यात आला. 2020 मध्ये या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यातील तब्बल तीस हजार लाभार्थी घरकुलासाठी पात्र ठरले होते. केंद्र सरकारच्या धोरणानुसार 2024 पर्यंत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळणे अपेक्षित आहे.

मात्र केंद्राचा अत्यंत संथ गतीने कारभार सुरू असून जिल्ह्यातील ठाणे आणि उल्हासनगर वगळता शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील तब्बल 27 हजार लाभार्थी घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्राकडून 2021 च्या लाभार्थ्यांची लक्षांक यादी ऑगस्ट 2022 मध्ये प्राप्त झाली. त्यामध्ये सुमारे तीन हजार लाभार्थ्यांची घरकुले प्रगतीपथावर आहेत. त्यानंतर 2022 ते 24 पर्यंत च्या लाभार्थ्यांचा लक्षांक अजूनही प्राप्त न झाल्याने शासन दरबारी खेट्या मारणार्‍या घरकुल लाभार्थ्यांच्या पदरी घोर निराशा आली असून घरकुलाविना त्यांना ऊन, वारा, पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारचे या योजनेकडे साफ दुर्लक्ष झाले असून लाभार्थ्यांची लक्षांक यादी प्राप्त होत नसल्याने आता पक्की घरे कधी मिळणार याकडे लाभार्थी डोळे लावून बसले आहेत.