शहापूरमध्ये ३ जिवलग मित्रांची सामूहिक आत्महत्या, घटनास्थळी सापडले मोबाईल!

shahapur suicide

शहापूर तालुक्यातील चांदा गाव आणि खर्डी येथे राहणार्‍या तीन मित्रांचे मृतदेह गावच्या बाहेर असणार्‍या एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आल्याने शहापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या तिघेजण जिवलग मित्र असून त्यापैकी दोघेजण मामा भाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांच्या सामूहिक आत्महत्यामुळे चांदा गावावर शोककळा पसरली आहे.

तिघांच्या मृत्यूप्रकरणी गावकर्‍यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या तिघांनी आत्महत्या केली असण्याची दाट शक्यता असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर येत आहे, अशी माहिती शहापूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक नवनाथ ढवळे यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्महत्या करणार्‍या तिघांमध्ये दोघे जण मामा भाचे असून या तिघांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही.

नितीन बेहरे (३०), मुकेश घावटे (२८) आणि महेंद्र दुबले (३१) अशी या तिघांची नावे आहेत. त्यापैकी नितीन आणि मुकेश हे दोघे मामा भाचे आहेत. दुबले आणि नितीन हे दोघेही विवाहित आहेत. नितीन हा शहापूर येथे राहण्यास असून महेंद्र दुबले आणि मुकेश घावटे हे दोघे शहापूर तालुक्यातील चांदा गाव येथे राहणारे आहेत. गुरुवारी सकाळी या तिघांचे मृतदेह चांदा गावाच्या बाहेर असलेल्या एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत शहापूर पोलिसांना आढळले. तिघेही एकमेकांचे जिवलग मित्र असून त्या तिघांनी एवढी टोकाची भूमिका का घेतली याबाबत काहीही कळू शकलेले नसल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी दिली.

पोलिसांनी या तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शहापूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत, प्रथमदर्शनी तपासात या तिघांनी एकत्र येऊन सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत असल्याची माहिती शहापूर तालुका विभाग पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितली. त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडलेली नाही.