उल्हासनगरात जूनमध्ये धावणार 30 इलेक्ट्रिक बसेस

उल्हासनगरात बस सेवा सुरु करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेवटी मनपा आयुक्त अजीज शेख यांनी तब्बल 9 वर्षांपासून बंद पडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याची तारीख निश्चित केली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात इका कंपनीच्या 30 इलेक्ट्रिक बसेस शहराच्या रस्त्यावर उतरवणार आहेत. पालिकेच्या या बसेस शहराच्या विभिन्न भागात तसेच शहराच्या बाहेर धावताना दिसणार आहेत. या बसेसमध्ये दिव्यांगासाठी विशेष खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती मनपा मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे. या पूर्वी परिवहन सेवेचा कंत्राट केष्ट्राल कंपनीचे राजा गेमनानी यांना 2009 साली देण्यात आले होते. परंतु सातत्याने डिझेल दरवाढ शहरातील खड्डेमय रस्ते मुळे बसेस मध्ये सातत्याने होणार्‍या बिघाड व बसेस च्या दुरावस्थेमुळे गेमनानी यांनी 2013 पासून प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर गेमनानी यांनी 2014 मध्ये परिवहन सेवा बंद केली.

महापालिकेने परिवहन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी अनेकदा निविदाही काढल्या होत्या. परंतु त्या निविदा भरण्यास कोणीही पुढे आले नाही. पालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी परिवहन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी परिवहन सेवेचा अभ्यास करून बसेस पुरवठा करणार्‍या कंपन्यांशी बोलणी करून सुमारे 45 कोटी रुपये खर्च करून 30 बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करताच हैद्राबाद मधील पिनॅकल कंपनीने निविदा भरली असून त्याला पालिकेने मंजुरी दिली आहे. ही कंपनी 12 वर्षाच्या करारावर परिवहन सेवा हाताळणार आहे. पुढच्या आठवड्यात या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात येणार असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात परिवहन सेवेच्या बसेस रस्त्यावर धावताना दिसेल. यात 30 सीटरच्या 15 आणि 54 सीटरच्या 15 अशा 30 बसेस धावणार आहेत. त्यात 15 सीटरच्या बसेस उल्हासनगर ते कल्याण, बदलापूरपर्यंत तर 30 सीटरच्या बसेस या टिटवाळा, भिवंडी, नवी मुंबई अशा लांब अंतरावर धावणार असल्याची माहिती अशोक नाईकवाडे यांनी दिली.