कर- दरवाढ नसलेला ३२९९ कोटींचा ठामपा अर्थसंकल्प सादर

निवडणुकीच्या तोंडावर सेनेची छाप असलेला अर्थसंकल्प- विरोधकांची टीका

कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, भांडवली खर्चात स्वीकरलेल्या दायित्वातील कामे पूर्ण करण्यावर भर देणारा, वास्तववादी अर्थसंकल्प तसेच कोरोना काळातही उत्पन्न वाढीसाठी साहाय्यभूत ठरणारा ठाणे महानगरपालिकेचा सन २०२१- २२ चा सुधारित ३५१० कोटी रूपयांचा तर सन २०२२-२३ यावर्षाचा ३२९९ कोटी रूपयांचा मुळ अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला.
याचदरम्यान मात्र आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवत या अर्थसंकल्पात विशेष करून या स्व.आनंद दिघे यांच्या स्मारकासह वागळे इस्टेट येथे नाट्यगृह बांधणे, क्लस्टर योजनेअंतर्गत सामंजस्य कराराची (MOU) अंमलबजावणी, फिल्म इन्स्टिट्यूट, थीम पार्क विकसित करणे , दिव्यात पालिकेचे अद्ययावत रुग्णालय नियोजित केले असून किसननगर येथे जॉइण्ड व्हेंचर अद्ययावत मॅटर्निटी रुग्णालय असे आदी २७ वैशिष्ट्यांचा समाविष्ट केली आहे. यावरून या अर्थसंकल्पावर शिवसेनेची छाप आल्याचे प्रखरतेने दिसून येत आहे.
ठामपा आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.मागील दोन वर्षात कोरोना या महाभयंकर विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जागतिक स्तरावर महामारी घोषित करण्यात आली. त्याचा परिणाम सर्व उदयोगधंदे, व्यवसाय व रोजगारावर झाल्यामुळे महापालिकेसही अपेक्षित असलेले कर, दर व शुल्कापोटी काही बाबींचा अपवाद वगळता उर्वरित बाबींपासून अपेक्षित महसुल प्राप्त झाला नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. हा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष प्राप्त होणा-या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करुनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सन २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक रु. २७५५ कोटी ३२ लक्ष रकमेचे तयार करण्यात आले होते. यामध्ये काही विभागांकडून अपेक्षित केलेले उत्पन्न साध्य होत नसले तरी शहर विकास विभागाकडून अपेक्षित उत्पन्नापेक्षा मोठया प्रमाणात वाढ झाल्याने तसेच शासनाकडून क्लस्टर योजना, पंधरावा वित्त आयोग, पायाभूत सुविधा अंतर्गत अनुदान तसेच माझी वसुंधरा अंतर्गत बक्षिस रक्कम इत्यादीचा विचार करता सुधारित अंदाजपत्रक रु.३५१० कोटी रकमेचे तयार केले आहे व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रु.३२९९ कोटी रकमेचे मूळ अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आला आहे.

उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत :
मालमत्ता कर :-
सन २०२२-२३ मध्ये मालमत्ता कर व फीसह रु. ७१३ कोटी ७७ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित केले आहे.

विकास व तत्सम शुल्क :-
सन २०२२-२३ मध्ये सदर सवलत लागू नसल्याने तसेच मोठया विकासकांकडून सवलतीचा लाभ घेण्यासाठी दाखल झालेले प्रस्ताव सवलत काळातच मंजूर झालेले असल्याने तसेच नविन नियमावलीनुसार काही शुल्काचे दर कमी झालेले असल्यामुळे व काही बाबी भुनिर्देशांकात समाविष्ट झाल्याने त्यापोटी मिळणारे अधिमुल्यात घट होणार असल्याने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात रु.५०० कोटी ४२ लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलेले आहे.

स्थानिक संस्था कर :-
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी या सर्व बाबींपासून रु.१२३९ कोटी ३९ लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.

पाणी पुरवठा आकार :-
पाणी पुरवठा आकारासाठी सन २०२२-२३ मध्ये रु.२०० कोटी उत्पन्न अपेक्षित करण्यात आले आहे.

अग्निशमन दल :-
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रु. १०४ कोटी ८० लक्ष उत्पन्न अपेक्षित केले आहे.

स्थावर मालमत्ता विभाग :-
२०२२-२३ मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून रु.२१ कोटी ५ लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.

जाहिरात फी :-
जाहिरात फी पोटी सन २०२२-२३ मध्ये रु.२२ कोटी उत्पन्न अंदाजित करण्यात आले आहे.

अनुदाने :-
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रु.१०७ कोटी ६७ लक्ष अनुदान अपेक्षित होते. डिसेंबर २०२१ अखेर रु.३२२ कोटी १५ लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने क्लस्टर योजनेसाठी रु.१४९ कोटी, पंधराव्या वित्त आयोगाकडून रु.२४.१५ कोटी व हवा गुणवत्ता अनुदानापोटी रु.४८.३० कोटी , माझी वसुंधरा अंतर्गत बक्षिस रु.५ कोटी ही अतिरिक्त अनुदाने प्राप्त झाल्याने सुधारित अंदाजपत्रकात रु. ३४२ कोटी ९७ लक्ष अपेक्षित केले असून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रु.१११ कोटी ७० लक्ष अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे.

कर्जे :-
आजमितीस महापालिकेवर रु.१४२ कोटी ७१ लक्ष कर्ज शिल्लक आहे. सन २०२१-२२ तसेच सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात कर्ज अपेक्षित केलेले नाही. अशा प्रकारे सन २०२१-२२ मध्ये आरंभिची शिल्लक रु.२६९कोटी ६४ लक्षसह सुधारित अंदाजपत्रक रु.३५१० कोटी व सन २०२२-२३ मध्ये आरंभिची शिल्लक रु.२५० कोटी ७६ लक्षसह मूळ अंदाज रु.३२९९ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत.

खर्च बाजू :-
कोरोना स्थितीत वैदयकीय सेवा व सुविधांसाठी मोठया प्रमाणावर निधी खर्च करावा लागत असल्याने विकास कामांसाठी निधी अपुरा पडत आहे.सन २०२१-२२ मध्ये महसुली खर्चासाठी रु.१८१९ कोटी ६१ लक्ष खर्चाचे अंदाज प्रस्तावित होते. या आर्थिक वर्षात महसुली खर्चाच्या काही प्रमुख बाबींवर सुधारित अंदाजपत्रकात तरतुदी वाढवून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोरोना नियंत्रण उपाय योजनेसाठी रु.२२३ कोटी, पाणी खरेदीसाठी रु.४४ कोटी तसेच परिवहन सेवेसाठी रु.७६ कोटी इत्यादीचा समावेश आहे. त्यामुळे सुधारित अंदाजपत्रकात महसुली खर्च रु.२१४० कोटी २३ लक्ष करण्यात आले आहे. भांडवली खर्चासाठी रु.९३५ कोटी ३७ लक्ष तरतूद प्रस्तावित होती. भांडवली खर्चाच्या काही बाबींमध्ये कपात केली असून नगरसेवक निधी स्पील ओव्हरसाठी, प्रभाग सुधारणा निधी स्पील ओव्हर तसेच या आर्थिक वर्षासाठी काही रक्कम , मागासवर्ग निधीमध्ये स्पील ओव्हरसाठी वाढ करण्यात आली असून भांडवली खर्च रु.१११९ कोटी १ लक्ष करण्यात आला आहे.सन २०२२-२३ मध्ये खर्चासाठी तरतुदी प्रस्तावित करताना उत्पन्नातील अपेक्षित घट विचारात घेऊन जवळपास सर्वच खर्चात काटकसरीचे धोरण कायम ठेवण्यात आलेले असून केवळ अत्यावश्यक असलेले नविन प्रकल्प वगळता हाती घेतलेल्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला आहे.

वैशिष्टयपुर्ण प्रस्तावित कामांचा
तलाव सुशोभिकरण :-
ठाणे शहर हे तलावाचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराची ही ओळख टिकवून ठेवणे यासाठी यावर्षी विभिन्न तलावांचे सुशोभिकरण करण्याचा मानस असून त्यासाठी रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मारक :-
ठाणे शहराच्या विकासामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे योगदान सर्वश्रृत आहे. अशा ऊत्तुंग व्यक्तीमत्वाचा यथोचित गौरव म्हणून ठाणे शहरात धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी रु.५ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
जांभळी नाका मार्केट पुनर्विकास :-
जांभळी नाका येथील शिवाजी मंडई भाजी मार्केट व मच्छी मार्केट विकासासाठी रक्कम रु.५ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
पार्किंग सुविधांचे निर्माण व भुमिगत वाहनतळ :-
शहरात पुरेशी पार्किंग सुविधा निर्माण करता यावी यासाठी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
भुमिगत वाहनतळाकरीता रक्कम रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व अद्यावतीकरण :-
शहरातील सर्व झोपडपट्टयामधील शौचालयाची दुरुस्ती व अदयावतीकरणासाठी रु. ११ कोटी रकमेची कामे लवकरच हाती घेण्यात येणार असून रु.१५ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. असा एकूण रु.२६ कोटींचा निधी शौचालय दुरुस्ती व अद्यावतीकरणसाठी उपलब्ध होणार आहे.

शहर सौदर्यींकरण :-
शहर सौंदर्यीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. शहर सौदर्यींकरणाअंतर्गत विविध कामासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आलेला असून त्याअंतर्गत रु.१३० कोटीची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात रक्कम रु.२५ कोटी वाढीव तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. असा एकूण रु. १५५ कोटी निधी शहर सौंदर्यीकरणासाठी उपलब्ध होणार आहे.

शाळा परिसरात सुरक्षा उपाय योजना –
डब्ल्यु. आर. आय. स्कुल झोन सेफ्टी मेजर्स (WRI School zone Safety Measures) अंतर्गत शाळा परिसरात सुरक्षा उपाय योजना करणेसाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

अर्बन डेन्स फॉरेस्ट्री (Urban Dense Forestry) :-
शहरी वनीकरणाअंतर्गत विविध कामांसाठी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात रक्कम रु. 5 कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

थीम पार्क विकसित करणे :-
शहराच्या विविध भागांमध्ये थीम पार्कस् विकसित करण्यासाठी या लेखाशिर्षाअंतर्गत सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात रक्कम रु.२ कोटी वाढीव तरतुदीसह एकूण रु.४ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

फिल्म इन्स्टिटयूट :-
ठाणे शहरात फिल्म इन्स्टिटयूट उभारण्याचा महापालिकेचा मानस असून त्या माध्यमातून चित्रपट सृष्टीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सदर लेखाशिर्षाअंतर्गत सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात रक्कम रु.५ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

रस्ते सुरक्षेसाठी फुटपाथ :-
सदर लेखाशिर्षाअंतर्गत विविध कामांसाठी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात रक्कम रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

पाणी पुरवठा विस्तार व मजबुतीकरण :-
सदर लेखाशिर्षाअंतर्गत विविध कामांसाठी रक्कम रु.१० कोटी वाढीव तरतुदीसह एकूण रु.५० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

वाहतुक नियमन उपाययोजना :-
वाहतूक नियमन उपाय योजनेसाठी वाहतूक नियमन या लेखाशीर्षांतर्गत रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करणे :-
ठाणे महानगरपालिका परिसरात महत्वाच्या दळणवळणाच्या रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करण्याकरीता सुमारे रु. २५० कोटींची कामे लवकरच हाती घेण्यात येणार असून याव्यतिरिक्त रस्त्यावरील खड्डे बुजविणेकरीता रस्ते दुरुस्ती (Pot holes) या लेखाशीर्षांतर्गत रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. असे सुमारे रु. २६० कोटींचा निधी रस्त्याचे अद्यावतीकरणासाठी उपलब्ध होणार आहे.

मॉडेला मिल येथे ट्रक टर्मिनस :-
मॉडेला मिल येथे ट्रक टर्मिनस विकसित करण्यात येणार असून यासाठी या लेखाशीर्षांतर्गत रु.१ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

वागळे इस्टेट येथे नाट्यगृह बांधणे :-
वागळे इस्टेट येथे नवीन नाट्यगृह बांधणेसाठी या लेखाशीर्षांतर्गत रु.५ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

खारेगाव येथे ट्रक टर्मिनस :
ठाणे शहरातील अवजड वाहतुकीचे नियमन करणेसाठी खाजगीकरणातून खारेगाव येथे ट्रक टर्मिनस विकसित करणेचे नियोजित आहे.

क्लस्टर योजनेअंतर्गत सामंजस्य कराराची (MOU) अंमलबजावणी
या योजनेअंतर्गत विविध कामांसाठी रु.१४९ कोटी निधी उपलब्ध करण्यात येत असून सदर कामांची अंमलबजावणी सुरु आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिका व सिडको यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.

प्रदुषण निंयत्रणाकरीता विविध योजना / कामे :-
1. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत (NATIONAL CLEAN AIR PROGARMME) अंतर्गत केंद्रीय पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत हवा प्रदुषण कमी करणे व हवेची गुणवत्ता वाढणे यासाठी रु.48 कोटी निधी उपलब्ध करण्यात येत असून प्रामुख्याने खालील कामे हाती घेण्यात येणार आहेत.
• ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेकरीता ८१ इलेक्ट्रीक बसेस खरेदी करणे.
• वागळे इस्टेट स्मशान भुमीमध्ये PNG शवदाहिनी बांधणे.
• Dust Sweeping मशीन खरेदी करणे.
• पालापाचोळा कचरा व्यवस्थापनासाठी Horticulture Composting Plant उभारणे.
• धुळ प्रदुषण नियंत्रणासाठी Mist spray machine उभारणी करणे.

तसेच वर्ष २०२२-२३ मध्ये अधिकचा रु. ४८ कोटी निधी उपलब्ध होणार असून एकंदरित रु. ९६ कोटी निधीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
माझी वसुधंरा अभियान अंतर्गत ठाणे महानगरपालिका ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली असून ही बाब महापालिकेसाठी अत्यंत भुषणावह आहे. त्याअंतर्गत प्राप्त बक्षिसाच्या रक्कमेतून हरित क्षेत्र वाढविणे, जल संवर्धन करणे, इलेक्ट्रीक चार्जींग स्टेशन उभारणे अशा प्रकारची विविध कामे हाती घेण्यात येत आहेत. यासाठी रु.१० कोटीचा निधी उपलब्ध करण्यात येत असून ही कामे हाती घेण्यात येतील

घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत विविध योजना / कामे :-
डायघर येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अंतर्गत टप्पा क्र. 1 कार्यान्वयीत करणे:-
मौजे डायघर येथील प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले असून मौजे डायघर येथे पहिल्या टप्प्यात १२०० मेट्रिक टन क्षमतेचा MRF (Material Recovery Facility) प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे.
याकरिता रु. २० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

कचरा संकलनासाठी यंत्रणा (Garbage Collection Mechanism)
शहरामधील बैठी घरे, डोंगर उतारावरील झोपडपट्टया, दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये निर्माण होणा-या दैनंदिन २०० टन कच-याच्या संकलनाकरिता पर्यावरणाभिमुख वाहने (ई-रिक्षा) वापरून पर्यावरणाचा समतोल राखून कचऱ्याचे संकलन करणेकरिता ५० ई-रिक्षा खरेदी करण्याचे नियोजन आहे. याकरिता सन २०२२-२३च्या अंदाजपत्रकात रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

भंडार्ली येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प :-
ठामपा क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेकरिता ठामपामार्फत मौजे भंडार्ली येथे शास्त्रोक्त भरावभूमी (SLF), तयार करून ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता भंडार्ली क्षेपणभूमी विकास या लेखाशीर्षांतर्गत रु. ५ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

कचरा वेचकांचा सहभाग योजना :-
ठाणे शहरातील भौगोलिक रचना लक्षात घेता, काही ठिकाणी कचरा संकलनाकरिता कोणतेही वाहन पोहोचू शकत नाही अशा भागांमध्ये घरोघरी कचरा संकलनाची व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. याकरिता शहरांतील कचरा वेचक, स्थानिक महिला मंडळ व सामाजिक संस्था यांना एकत्रीत करून भौगोलिक परिस्थितीनुसार घरांचे गट तयार करून अशा संस्थांच्या माध्यमातून घरोघरी वर्गीकृत कचरा संकलनाचे काम करण्यात येणार आहे.

याकरिता कचरा वेचक मानधन या लेखाशीर्षांतर्गत रु. ५ कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
कचरा निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया करणे :-
केंद्र शासनाने जाहिर केलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत १०० किलो पेक्षा कमी कचरा निर्मात्यांना कचरा निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया करणेकरिता प्रोत्साहित करणेसाठी शहरातील बैठी घरे व ५० फ्लॅट पर्यंतच्या (कमाल १०० किलो पर्यंत) इमारतीतील कचऱ्यापासून कंम्पोस्टिंग करणेकरिता पीट्सची उभारणी किंवा कंम्पोस्टींग ड्रम महापालिकेमार्फत पुरविण्यात येतील.

महापालिका शाळा मजबुतीकरण :
महापालिका शाळांच्या मजबुतीकरण व दुरुस्तीसाठी सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात रक्कम रु.२० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे सशक्तीकरण:-
यासाठी सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात रु.१० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

पार्किंग प्लाझा येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना:-
सद्यस्थितीत पार्किंग प्लाझा येथे ५० खाटांचा बाल रुग्णांसाठीचा अतिदक्षता विभाग (PICU) कार्यरत असून त्यामध्ये प्रथमत: ३० खाटांचा नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (NICU) ची बेड मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून उभारणी करणे.
सद्यस्थितीत पार्किंग प्लाझा येथे ठामपाचे ११०० खाटांचे कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्याकरिता डीसीएच सुरु आहे. ठाणे शहरात कोव्हिडची साथ कमी झाल्यावर सदर ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खाजगी वैद्यकीय संस्था/ तज्ञांच्या सहभागातून सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

ठाणे शहरासाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल चालू करण्याचे प्रयोजन:-
टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या सहयोगातून कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करण्याचे प्रयोजन आहे. तसेच या ठिकाणी नर्सिंग कॉलेजसह पॅरामेडिकल कोर्सेस सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.

पाणी पुरवठा योजना :
ठाण्याच्या नागरिकांना सर्व विभागात सारख्याच प्रमाणात स्वच्छ पुरेसा पाणी पुरवठा करणे यासाठी खालीलप्रमाणे भर देण्यात आलेल्या क्षेत्राची निवड करण्यात आली आहे.

ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यातील वाढीचे नियोजन :-
ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक असणा-या वाढीव पाणी पुरवठयासाठी पाणी पुरवठा विभागामार्फत पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेचे पंप बसविण्याचे काम हाती घेतले आहे.या कामांतर्गत जुने ६०० अश्वशक्तीचे पंप बदलून ११५० अश्वशक्तीचे ५ पंप बसविण्यात येत आहेत. यामुळे ठाणे शहरास अतिरिक्त १०० द.ल.लि. प्रतिदिन पाणी पुरवठयात वाढ होणे अपेक्षित आहे.

वितरण व्यवस्थेचा विस्तार व मजबुतीकरण :-
ठाणे शहरातील उत्तर विभागाकडील (घोडबंदर रोड परिसर ) रिमॉडेलिंग योजनेअंतर्गत नवीन वहन वाहिनी टाकणे, 3 जलकुंभ व 2 संप पंप हाऊस व वितरण वाहिन्या टाकण्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तसेच दिवा व मुंब्रा प्रभागासाठी रिमॉडेलिंग योजनेचे काम सुरु आहे. या अंतर्गत नवीन वहन वाहिनी टाकणे, जलकुंभ व संप पंप हाऊस बांधणे व वितरण वाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. उर्वरित विभागासाठी रिमॉडेलिंग अंतर्गत कामे करणेसाठी केंद्र शासनाच्या अमृत 2.0 मधून निधी उपलब्ध होणेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

महसुल न मिळणा-या पाण्याचे प्रमाण कमी करणे :-
ठाणे शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक इमारती, रहिवासी इमारती व झोपडपट्टी विभागातील नळ संयोजनावर स्मार्ट वॉटर मिटर बसविण्याचे काम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत सुरु आहे. या कामांतर्गत 1,13,328 नळ संयोजनांवर स्मार्ट वॉटर मिटर बसविणे प्रस्तावित असून, आजपर्यंत 72,347 संयोजनांवर जलमापके बसविण्यात आली आहेत. तसेच बसविण्यात आलेल्या 48,200 संयोजनांना जलमापकाच्या नोंदीनुसार पाणी देयके देण्यात आलेली आहेत. नजिकच्या कालावधीत सर्व संयोजनांना स्मार्ट वॉटर मिटर बसवून जलमापकाच्या नोंदीनुसार पाणी देयके देण्यात येतील, जेणेकरुन महसूल न मिळणा-या पाण्याचे प्रमाण कमी करता येणे शक्य होईल.

दिवा येथे महानगरपालिकेमार्फत अद्ययावत रुग्णालय नियोजित असून यासाठी वर्ष २०२२-२३ मध्ये रु.५ कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.
किसननगर येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा विस्तार म्हणुन अद्ययावत मॅटर्निटी रुग्णालय जॉईंट व्हेंचर तत्वावर प्रस्तावित करण्यात आले असून लवकरच कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातील विविध लेखाशिर्षांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार ध्येये साध्य करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे रु.३० लक्ष अखेरच्या शिल्लकेसह रु.२१७० कोटी २५ लक्ष महसुली व रु.११२८ कोटी ४५ लक्ष भांडवली खर्च असे एकूण रु. ३२९९ कोटी रकमेचे खर्चाचे अंदाज सादर केले आहे.

५०० फुटांच्या घरांना कर माफ मिळाल्यावर ८५ कोटींचा पडणार बोजा
गेल्या वर्षी कोरोनासाठी २३० तरतूद होती. यंदाही १०० कोटी तरतूद केली आहे. तसेच पहिला डोस घेण्याचे प्रमाण ९० तर दुसरा डोस घेण्याचे प्रमाण ७० टक्के झाले आहे. येत्या १ एप्रिल पासून ५०० फुटांच्या घरांना कर माफी मिळाल्यावर ८० ते ८५ कोटींची तूट निर्माण होणार असल्याने आयुक्त डॉ शर्मा यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींचा केला सभात्याग
स्थायी समितीत अर्थसंकल्प सादर करताना ही सभा प्रत्यक्ष नाहीतर ऑनलाईन पद्धतीने घेतल्याने काही नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्यांनी सभात्याग केला. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, भाजपचे पाटणकर यांचा समावेश आहे.

कॉंग्रेस नगरसेवकाची घोषणाबाजी
महापालिका मुख्यालयात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सुरू झालेल्या पत्रकार परिषदेत अचानक काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी प्रवेश करत, अर्थसंकल्प फुटल्याने गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई अशी मागणी करत, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे बल्लाळ सभागृहात एकच गोंधळ उडाला. यावेळी आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी चौकशी केली जाईल, असे म्हटल्यावर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

श्रद्धांजलीचा आयुक्तांना पडला विसर
नुकतेच भारतरत्न लता मंगशेकर यांचे निधन झाले आहे. दोन दिवस शासकीय दुखावटा पाळला गेला. तसेच दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयातील कै बल्लाळ सभागृहात ठामपा परिवहनचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी तेथे दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मात्र गुरुवारी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी महापालिका प्रशासनासह आयुक्तांना भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचा विसर पडल्याचे निर्दशनास आले. सभा तहकूब सोडा साधी लतादीदींना श्रद्धांजली वाहण्याचे सौजन्य ही कोणी दाखवले नाही. एकदाचा अर्थसंकल्प सादर करून घेतला असेच दिसून आले.

पालिकेला अजूनही शहाणपण नाही
‘जुने ठाणे नवीन ठाणे’ ‘बॉलीवुड पार्क’ या प्रकल्पात कोट्यवधी रुपये वाया गेले. मात्र, ठाणे महापालिकेला अजूनही शहाणपण आलेले नाही. ठाणे शहरातील नागरिकांना पिण्याचे पुरेसे पाणी पुरविण्यातही महापालिका अपयशी ठरत असताना थीम पार्कसाठी वाढीव तरतूद व फिल्म इन्स्टिट्यूट उभारण्याचा प्रस्ताव संतापजनक आहे. या प्रस्तावातून एखाद्या बॉलीवूड निर्मात्याची सोय लावण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा संशय येतो. तब्बल ४० वर्ष महापालिकेच्या स्थापनेला होत असताना स्वतंत्र धरणासाठी यंदाच्याही अर्थसंकल्पात काहीही सुतोवाच नाही, ही शोकांतिका आहे.
– मनोहर डुंबरे, भाजपा गटनेते