बेकायदा वाहन विक्री करणाऱ्या टोळीकडून ३३ दुचाकी जप्त

नागरिकांच्या कागदपत्रांचा वापर करून फसवणूक

two wheeler bikes

भिवंडी शहरातील गरीब आणि गरजू नागरीकांना हेरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आधारकार्ड पॅनकार्ड कागदपत्रांची बेकायदा मागणी करणा-या टोळीला ताब्यात घेतले. या कागदपत्रांच्या मोबदल्यात पाच हजार रुपये अथवा सहा महिन्यांनी दुचाकी देण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या कागदपत्रांची फसवणूक करीत त्यावर बँक अथवा फायनान्स कंपनी कडून कर्ज घेत दुचाकी काढून त्या परस्पर ५० ते ६० टक्के किमतीला विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. यामध्ये तब्बल ३२ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त करीत चार जणांच्या टोळीला अटक करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश मिळाले असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी भिवंडी गुन्हे शाखेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सहा महिन्यांपूर्वी असद समद बेग यास काही जणांनी कागदपत्रांच्या मोबदल्यात दोन फायनान्स कंपनी मधून कर्जावर तीन दुचाकी काढल्याचे त्याच्याकडे फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी आले. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शरद बरकडे करीत होते. त्यावेळी माहितीच्या आधारे शाह मोहम्मद आसिफ मोहम्मद आझम उर्फ बावटा याला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली.

त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शहरातील वेगवेगळ्या शोरूम मधून कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करीत अनेक दुचाकी कमी किमतीत विक्री केल्याचे आढळले. त्याचे साथीदार अल्ताफ लतीफ शेख, शफिक अब्दुल लतीफ अन्सारी, अरबाज आसिफ मोमीन उर्फ देवा या चार जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून तब्बल ३३ दुचाकी ६ मोबाईल असा एकूण ३२ लाख ३६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक शरद बरकडे, रमेश शिंगे, सहपोलीस उप निरीक्षक हनुमंत वाघमारे, रामसिंग चव्हाण, लक्ष्मण फालक, पोलीस हवालदार सुनील साळुंके, रामचंद्र जाधव , मंगेश शिर्के, सचिन जाधव, साबीर शेख, रंगनाथ पाटील, भावेश घरत, रवींद्र घुगे, नरसिंह क्षीरसागर यांच्या पथकाने आरोपींनी भिवंडी सह मालेगाव या भागात विक्री केलेल्या वाहनांचा शोध घेत आरोपींना गजाआड केले.