घरठाणेएका शासन निर्णयाने महापालिकेची ३६०० पदे रिक्त

एका शासन निर्णयाने महापालिकेची ३६०० पदे रिक्त

Subscribe

दर महिन्याला १५ ते २० अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. अशाच रीतीने रिक्त होणार्‍या पदांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच २०२० मध्ये केवळ वैद्यकीय क्षेत्रातील पदे वगळता इतर कोणत्याही प्रकारची पदे भरण्यात येऊ नये या शासनाच्या अद्यादेशामुळे ठाणे महापालिकेतील रिक्त पदांचा आकडा आता तीन हजार ६०० वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे ही वर्ग चार या श्रेणीतील आहेत. तर याच कालावधीत १,५१५ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले असल्याने कळत नकळत उपस्थित असलेल्या महापालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामांचा ताण देखील वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे

मागील काही वर्षांपासून ठाणे महापालिकेत अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यातही मागील दोन वर्षात महापालिकेतून अनेक अधिकारी, कर्मचारी हे सेवानिवृत्त झाल्याने पालिकेत ५० टक्के कर्मचार्‍यांची वाणवा दिसून येत आहे. आज ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार देखील वाढला आहे. स्मार्टसिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या योजना पालिकेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. परंतु या योजनांची पूर्ती करण्यासाठी एका एका अधिकार्‍याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील कामासाठी पालिकेत कर्मचारी तसेच अधिकार्‍यांची वाणवा असल्याने वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत. तर काही अधिकार्‍यांकडे उपअभियंते, कार्यकारी अभियंते, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांच्यावर पाच – पाच विभागांचा कार्यभार असताना काहींना तर प्रभारी कार्यभारही सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यातही सध्या दर महिन्याला निवृत्त होणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या ही १५ ते २० च्या घरात असून ही गळती अशीच सुरू राहिली तर २०२० पर्यंत अर्ध्याहून अधिक पालिका अशा प्रकारे रिकामी झाली असेल. दुसरीकडे पालिकेतील काही पदे भरण्यासाठी पालिकेने आकृतीबंध तयार केला होता. त्यानुसार हा प्रस्ताव २०११ मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु त्याची देखील अंमलबजावणी झालेली नाही. त्यात २०१९ मध्ये २०८५ पदे रिक्त होती. आता दोन वर्षात त्यात आणखी भर पडली असून ही संख्या ३६०० वर गेली आहे. याचाच अर्थ दोन वर्षात १५१५ कर्मचारी आणि अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही मोठी पोकळी निर्माण झाली असून दर महिन्याला त्यात आणखी भर पडत आहे. मे २०२० मध्ये झालेल्या शासन निर्णयामुळे नवीन पदांची भरती रखडली असून कोरोना काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील पदेच भरा, असे शासनाने स्पष्ट केले असल्याने नवीन पदांची भरती अद्यापही झालेली नाही.

रिक्त पदांची संख्या
वर्ग १ – ११५
वर्ग २ – १२५
वर्ग ३ – १५४०
वर्ग ४ – १७५४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -