नेहमी खुन्नस देत असल्याच्या रागातून कळव्यात एकाची हत्या

आरोपी १२ तासातच पोलिसांच्या ताब्यात

45 Year Old Man Found Dead With Injury Marks On Face

नेहमी समोर आल्यावर खुन्नस देत असल्याच्या रागातून कळव्यात नव वर्षाच्या पहाटे एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ तासातच २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. दीपक महाकाळ असे आरोपीचे नाव आहे. समोर भेटल्यावर नेहमी खुन्नस द्यायचा म्हणून एकदाचाच संपवल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिली आहे.

मंगेश केदार (४५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगेश कुटुंबासोबत साईसृष्टी सोसायटी, खारेगाव नाका, कळवा येथे राहत होते. घरापासून काही अंतरावर असलेल्या चाळीत मंगेश केदार यांचे जुने घर असून अधून मधून ते तिथे येत. ३१ डिसेंबरच्या रात्री मंगेश यांचे सर्व कुटुंब थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशन नवीन घरी झोपायला गेले, मात्र मंगेश हे रात्री आपल्या जुन्या चाळीतील खोलीतच झोपी गेले होते. शुक्रवारी सकाळी मंगेश यांचा मुलगा रोहित याला चाळीतील महिलांनी फोन करून तुमच्या घराचा दरवाजा उघड असून वडील काही हालचाल करत नसल्याचे सांगितले. यावेळी मुलगा रोहित धावतच चाळीतील खोलीवर गेला असता, त्या ठिकाणी वडील मंगेश हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरेकर हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मंगेश यांना कळवा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दरेकर यांनी ताबडतोब एक पथक गठीत करून तपास सुरु केला असता, रात्री उशीरा मंगेश याच्या घराजवळ खारेगाव नाका येथे राहणारा आरोपी दीपक महाकाळ (२५) याला बघितले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने आरोपी दीपकचे घर गाठले असता तो सकाळीच देवदर्शनला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला अशी माहिती त्याच्या घरच्यांनी दिली. पोलिसांनी वेळ न दडवता ताबडतोब रेल्वे स्थानकावर त्याचा शोध सुरु केला असता दीपक हा ट्रेनची वाट पहात फलाटावर बसला असल्याची दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता मंगेश केदार हा नेहमी वाटेत भेटल्यावर मला खुन्नस द्यायचा यावरून अनेक वेळा आमच्यात भांडण देखील झाली होती. अखेर त्याला कायमचा संपवण्याचे ठरवून ३१ तारखेला मंगेश हा घरात दारूच्या नशेत एकटा झोप असता त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची कबुली दीपक याने पोलिसांना दिली अशी माहिती दरेकर यांनी दिली.