येऊरमध्ये बांधले जाणार नवे ५ सिमेंट काँक्रीट बंधारे, शहरी भागातील असा पहिलाच प्रयोग

5 new cement concrete dams to be constructed at Yeoor
5 new cement concrete dams to be constructed at Yeoor

ठाणे तालुक्यातील ८ नवीन गेटेड सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे व येऊर येथील हुमायून बंधारा दुरुस्ती करण्याचे कामांना मृदा व जलसंधारण विभागाने मंजूर हिरवा कंदील दाखला आहे. येऊर येथे जुन्या हुमायून बंधाऱ्याची दुरुस्ती करून आणखी नवीन ५ बंधारे बांधले जाणार आहेत. या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव उपवनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. शहरी भागात अशाप्रकारे जलसंधारण करण्यासाठी बंधारे बांधण्याचा हा पहिला प्रयोग आहे. येऊर येथे बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्यातून ठाण्याला ३ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे, तसेच वन्यप्राण्यांनाही जंगलातच पाणी वर्षभर मिळेल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

येऊर येथे धबधबा असून पावसात हे सगळे पाणी वाहून जाते. तेथे वाया जाणारे पाणी वापरात यावे यासाठी येथे बंधारे बांधण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी केली होती. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार सरनाईक यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी मंत्र्यांनी याबाबत जलसंधारण विभागाला सर्वे करण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबत फेब्रुवारी महिन्यात मंत्री गडाख यांच्यासोबत आमदार सरनाईक व संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली होती. त्यानंतर या कामाचा सर्वे करून प्रत्यक्षात कामाचा प्रस्ताव , कामांचे अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

येऊर येथे दरवर्षी पावसात पाणी वाहून जाते. येऊर येथे स्थानिक नाल्यावर नवीन ५ सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच येऊर येथील हुमायून बंधारा साधारण ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. आता तो खराब झाला आहे. त्या हुमायून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपञक ही बनविण्यात आले आहे. ५ नवीन बंधारे व हुमायून बंधारा दुरुस्तीसाठीचे अंदाजपञक बनवून या कामांना तांत्रीक मान्यता देण्यात आली आहे. ठाणे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्र. व. खेडकर यांनी या कामांना मान्यता देऊन या कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी हा प्रस्ताव संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनपरिक्षेत्र यांच्या उप वन संरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. आता वन विभागाने मान्यता दिल्यानंतर हे काम सुरु होणार आहे.

३ एमएलडी पाणी उपलब्ध होणार !

येऊर येथे बंधारे बांधकाम केल्याने साधारण ३ एमएलडी पाणी त्यातून उपलब्ध होणार आहे. चेना नदीवर व येऊर येथे हे बंधारे बांधण्यासाठी एकूण सुमारे ९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे काम याच वर्षात प्रत्यक्षात सुरु होण्यासाठी पाठपुरावा सुरु राहील. हे बंधारे झाल्यामुळे वन्यप्राण्यांनाही जंगलातच पाणी वर्षभर मिळणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना रस्त्यावर यावे लागणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशाप्रकारे जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी झाली आहेत. मात्र शहरी भागात पहिल्यांदा पाणी अडवून त्याचा सदुपयोग व्हावा म्हणून बंधारे बांधकाम करण्याचे काम होणार असल्याचे आमदार सरनाईक यांनी सांगितले.