ठाण्यात ५०० फुटांच्या घरांना मिळणार करमाफी

Thane Municipal Corporation
ठाणे महापालिका

तब्बल दीड वर्षांनी झालेल्या पहिल्याच ऑफलाईन महासभेत लोकप्रतिनिधींनी ठाणेकर नागरिकांसाठी गुड न्युज दिली. २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला. या ठरावाला स्वपक्षीय लोकप्रतिनिधी मंजूर दिल्याने हा ठराव लवकर शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी हा ठराव लवकर शासनाकडे पाठविण्यात येईल तसेच नगरविकास खात्याचे मंत्री हे ठाण्याचे पालकमंत्री असल्याने त्या ठरावाला आगामी निवडणुकीपूर्वी मंजूर मिळाले असा विश्वास व्यक्त केला. तर हा ठराव निवडणुकीचा जुमला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या ठरावामुळे महापालिकेला करोडो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबडेकर सभागृहात गुरुवारी पहिल्यांदा ऑफलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या महासभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दाखला देत, त्यांनी ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मंजुर करावा आणि शासनाकडे पाठवावा, असे सांगितले. त्यानुसार तसा ठराव सभागृहात घ्यावा, अशी सूचना केली.