घरठाणेआदिवासी गावांचा कायापालट होणार

आदिवासी गावांचा कायापालट होणार

Subscribe

भिवंडी लोकसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याने आदिवासी भागातील रस्त्यांसाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. या कामांमुळे आदिवासी बांधवांचा दररोजचा प्रवास सुकर होईल. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील प्रतिनिधीत्व करीत असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा समावेश होतो. या गावांमध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे. या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी श्री. कपिल पाटील यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आदी आदर्श गाव योजनेमध्ये ठाणे जिल्ह्यातील १२१ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार या गावांच्या विकासासाठी आराखडे तयार करण्यात येत आहेत. गावातील ग्रामस्थांच्या गरजांचा आदर्श गाव आराखड्यात समावेश करण्यासाठी तीन वेळा ग्रामसेवक व सरपंचस्तरावरील बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी अस्तित्वातील रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज स्पष्ट झाली होती. बहुसंख्य गावातील सरपंचांकडून रस्त्यांच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्याची विनंती करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार राज्य सरकारने आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत लेखाशीर्ष ३०५४ अन्वये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भिवंडी, मुरबाड, शहापूर, वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा समावेश असलेला शासन निर्णय राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने १६ फेब्रुवारी रोजी जारी केला. त्यामुळे या गावांचा विकास दृष्टीपथात येणार आहे. या गावातील रस्त्यांबरोबरच १२१ गावांमध्ये पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना आदींना प्राधान्य दिले जात आहे. आदिवासी गावांना जोडण्यासाठी ओढ्यांवर साकव, पाड्यांमध्ये सौरउर्जेवर आधारित लघु नळपाणी पुरवठा योजना आदी कामांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आदिवासी महिलांचे बचतगट स्थापन करून महिलांच्या सक्षमीकरण, पिंजऱ्याच्या माध्यमातून मत्स्यशेती आदींवर भर देण्यात येत आहे.

- Advertisement -

भिवंडी लोकसभा मतदारसंघात ७१ कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे आभार मानले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन मंत्री विजयकुमार गावित यांनी रस्त्यांसाठी निधी दिला, याबद्दल राज्यमंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -