घरठाणेठाण्यातून ९०४ फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स हटवले

ठाण्यातून ९०४ फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स हटवले

Subscribe

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत दर बुधवारी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढण्याची कारवाई करण्यात येते. बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी स. ६ ते स. १० या वेळेत राबविण्यात आलेल्या विशेष कारवाई मोहिमेत महापालिका क्षेत्रातून ९०४ फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स काढण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या प्रभाग समिती क्षेत्रात काही नागरिक परवानगी न घेता फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. यामुळे प्रत्येक बुधवारी हे फलक, पोस्टर्स हटविण्याबाबत विशेष मोहीम घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात सर्वाधिक २६९ बॅनर्स, फ्लेक्स हे नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून हटविण्यात आले.

तात्पुरत्या बॅनरसाठी परवानगी
ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय, तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, तात्परुते बॅनर, पोस्टर लावण्यासाठी एकूण २०४ जागा ठरविण्यात आल्या आहेत. महापालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊन त्यानुसार भाडे भरल्यावर या जागांवर तीन दिवसांपर्यंत पोस्टर, बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे. तात्पुरत्या जाहिरातींसाठी ८ बाय ६, ८ बाय ३ आणि ६ बाय ३ असे तीन प्रकार निर्धारित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रती दिन, प्रती चौ. फूट १०० रुपये याप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. या जाहिरातींसाठी परवानगी घेण्यासाठी https://tmc.advertisepermission.in/या वेब पोर्टलवर अर्ज करता येईल. त्यात आवश्यक त्या जागा, फलकाचा आकार ही माहिती भरल्यानंतर किती भाडे भरावे लागेल याची माहिती येईल. त्यानुसार, ऑनलाईन भाडे भरल्यावर क्यू आर कोड तयार होईल. हा क्यू आर कोड तात्पुरत्या जाहिरातींवर लावणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

कारवाईची आकडेवारी

प्रभाग समिती फ्लेक्स, बॅनर्सचा आकडा
नौपाडा -कोपरी २६९
वागळे – ७४
वर्तकनगर – ७५
लोकमान्य नगर-सावरकर नगर – १५०
माजिवडा -मानपाडा – ८०
उथळसर – ११
कळवा – ५०
दिवा – १२३
मुंब्रा – ७२
एकूण – ९०४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -