धावत्या एक्सप्रेसमधून पडून एका १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद

धावत्या एक्सप्रेस मधून पडून एका १६ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोपर – दिवा रेल्वे स्थानका दरम्यान बुधवारी घडली. शीतलकुमार राजकुमार साहानी (१६) असे मृत्यू  तरुणीचे नाव आहे. बिहार येथील मुजफ्फनगर येथील ही तरुणी आई- वडिलांसोबत पवन एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. प्रवासा दरम्यान तिला अस्वस्थ वाटू लागले. त्याच वेळी उलटी आल्याने ती एक्सप्रेसच्या दरवाज्यात आली. तेथे बसून ती उलटी करत होती.

उलटी करत असताना चक्कर आल्याने ती एक्सप्रेसच्या दरवाजामधून खाली पडली. मुलगी रेल्वेमार्गात पडल्याचे समजताच, तिच्या आईवडिलांनी एक्सप्रेसची साखळी खेचली. डोंबिवली रेल्वे स्थानकात एक्सप्रेस थांबल्यावर आई-वडिलांनी रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शितलकुमारला ताब्यात घेऊन तिला रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.