Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे मुलाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या मातेची आत्महत्या

मुलाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या मातेची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

मुलाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या ५२ वर्षीय महिलेने तुरुंगातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी आधारवाडी तुरुंगात घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.

मायाबाई रामदास आगळे (५२) असे आत्महत्या करणार्‍या महिलेचे नाव आहे. ठाण्यातील चिराग नगर परिसरात मोठा मुलगा शिवाजी रामदास आगळे (२५) आणि लहान मुलगा सतिश आगळे (२४) यांच्यासह राहणारी मायाबाई लोकांचे धुणेभांडे करून घर चालवत होती आणि मोठा मुलगा शिवाजी हा एका डेअरीमध्ये काम करून आईला हातभार लावत होता. मात्र, लहान मुलगा हा कुठलाही कामधंदा न करता सतत दारूच्या व्यसनात बुडालेला असायचा. सतिश हा आईकडे सतत दारूसाठी पैसे मागायचा. पैसे दिले नाही, तर तिला मारहाण देखील करीत होता. मुलाच्या सततच्या या त्रासाला कंटाळून आई मायाबाई, मोठा भाऊ शिवाजी यांनी एका नातेवाईकाच्या मदतीने ७ जानेवारी रोजी सतिशची राहत्या घरातच हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांनी मृतदेह कसारा घाटात दीडशे फूट खोल दरीत फेकून दिला होता.

- Advertisement -

९ जानेवारी रोजी आई मायाबाई आणि मोठा मुलगा शिवाजी हे दोघे सतिशचे कपडे घेऊन मृतदेह फेकला त्या ठिकाणी आले. सतिशचे कपडे कठड्यावर ठेवून अपघात भासवण्याचा त्यांनी महामार्ग पोलीस चौकी गाठली. चौकीत हजर असलेले अधिकारी अमोल वालझाडे यांना त्यांनी मला फोन आला होता, आमच्या मुलाचा घातपात झाला असल्याचे सांगण्यात आले असे वालझेडे यांना सांगितले. पोलीस अधिकारी वालझेडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना संशय येताच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने १५० फूट खोल दरीतील पोते वर काढले असता त्यात सतिशचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान महामार्ग पोलिसांनी मायाबाई आणि शिवाजी यांच्याकडे कसून चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली होती.

महामार्ग पोलिसांनी याप्रकरणी आई मायाबाई, भाऊ शिवाजी आणि एका नातेवाईकाच्या विरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती. जानेवारीपासून तिघांना न्यायालयीन कोठडीत आधारवाडी तुरुंगात ठेवण्यात आले होते. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मायाबाई हिने तुरुंगातील स्वच्छतागृहात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली.

- Advertisement -