घरठाणेअंबरनाथमध्ये भरधाव ट्रकने मायलेकींना फरफटत नेले

अंबरनाथमध्ये भरधाव ट्रकने मायलेकींना फरफटत नेले

Subscribe

ट्रकचालकाला अटक

अंबरनाथ । अंबरनाथ पूर्वेतील स्वामी समर्थ चौकातून शिवमंदिराकडे जाणार्‍या एका भरधाव ट्रक चालकाने एका दुचाकीला धडक देत मायलेकीला लांब फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे ११वाजता घडली आहे. या अपघातात ट्रकच्या पुढच्या टायरखाली आलेल्या दुचाकीवरील तरुणीचा एक पाय निकामी झाला आहे. तर तरुणीची आई गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही महिलांना उपचारासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी सकाळी स्वामी समर्थ चौकातून बायपास मार्गाकडे जाणार्‍या उतारावर ब्रेक फेल झालेल्या एक भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक देत या दुचाकीवरील दोन्ही महिलांना ट्रकखाली चिरडले त्यानंतर बायपास रस्त्यापर्यंत साधारण ५०० मीटर अंतरापर्यंत दुचाकी फरफटत नेली. या भीषण अपघातात दुचाकीवरील २२ वार्षिय तरुणी स्निग्धा असलेकर हिचे दोन्ही पाय निकामी झाले असून तिची आई प्रतिपदा असलेकर गंभीर जखमी झाली आहे. तसेच सुदैवाने या अपघातात उतारावरील इतर नागरिकांना ट्रकने धडक दिली नाही. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेनंतर शेजारील एका मठातील काही नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी तरुणीला तात्काळ उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा ट्रक अमरावतीहून मालाची वाहतूक करत अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीतील सीएट कंपनीत जात असताना हा अपघात झाला असून या प्रकरणी ट्रक चालक अब्दुल रजाक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -