ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूप्रकरणी गठीत केलेल्या समितीने गुरुवारी चौकशी सुरुवात केली. तर आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या सदस्यांनी महापालिका आरोग्य विभागाची तब्बल तीन तास चौकशी करत, या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. तर या समितीला येत्या २५ पर्यंत अहवाल त्या समितीला सादर करायचा आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील आठवड्यात गुरुवारी रात्री ५ जणांचा त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. या घटनेने एकच खळबळ उडाल्याने राज्याचे लक्ष या घटनेकडे लागून राहिले आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ९ जणांची चौकशी समिती गठीत करून येत्या २५ ऑगस्ट रोजी अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देताना काही सूचनाही नमूद केल्या आहेत.
या समितीमध्ये आरोग्य सेवा आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, आरोग्य सेवा संचालक मुंबई, सहाय्यक संचालक आदींचा समावेश आहे. त्यानुसार आयुक्त धीरज कुमार गुरुवारी ठाण्यात आले होते. त्या प्रमुखांना दुपारी महापालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात या समितीची बैठक पार पडल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार या समितीने पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे प्रश्न यावेळी उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे. रुग्ण क्षमता नसतांना अधिकचे रुग्ण दाखल का करुन घेतले गेले, रुग्णांवर योग्य वेळेत उपचार का झाले नाहीत, रुग्णांच्या मृत्युची नेमकी कारणे काय काय आहेत, आयसीयु विभागात उपचार करतांना तज्ञ डॉक्टर त्याठिकाणी हजर होते का?, आदींसह इतर महत्वाच्या बाबींची तपासणी त्यांनी यावेळी केली. याशिवाय कळवा रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती देखील त्यांनी घेतली असून किती डॉक्टरांची कमतरता आहे, किती पदे रिक्त आहेत, येथील उपकरणे योग्य पध्दतीने सुरु आहेत किंवा नाही? आदींची देखील माहिती घेतली असल्याचे सांगितले जात आहे. ही समिती काही दिवसात यासंदर्भात अहवाल सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- Advertisement -
- Advertisement -