घरठाणेकचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उभारण्यात आलेले हस्तांतरण स्थानक अर्धवटच

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उभारण्यात आलेले हस्तांतरण स्थानक अर्धवटच

Subscribe

ठाणे महानगरपालिकेचा कारभार

राज्याचे मुख्यमंत्री ज्या भागातून प्रतिनिधित्व करतात त्या वागळे इस्टेट येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात मोठे गौडबंगाल असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून तिची तिजोरी खाली करण्याचं काम महानगरपालिकेतील अधिकारी व ठेकेदार करत आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उभारण्यात आलेले हस्तांतरण स्थानकाचे काम अर्धवट अवस्थेत असून यावर गेल्या पाच वर्षांपासून खर्च मात्र करोडो रुपयांचा केला जात आहे. हस्तांतरण स्थानकाचे काम १८ महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नसून ५ वर्ष होऊन सुद्धा अद्यापही ठेकेदारावर महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केलेली नसल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाने उघडकीस आणली आहे.
ठाणे शहरातील वाढती लोकवसाहत लक्षात घेता घनकचऱ्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असताना त्या करण्याऐवजी भ्रष्टाचारासच अधिक प्राधान्य दिले जात आहे. पाच वर्ष उलटूनही वागळे इस्टेट येथील घनकचरा हस्तातरण केंद्रातील अनेक कामे प्रलंबित अवस्थेतच असल्याचे दिसून येत आहे. हस्तांतरण केंद्रातील संपूर्ण परिसरात संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असतानाही तसे करण्यात आले नाही. त्याबदल्यात तात्पुरत्या स्वरूपात केवळ काही ठिकाणी पत्रे  लावून थुकपट्टी करण्यात आली आहे. भिंत नसल्यामुळे प्रकल्पाच्या बाजूलाच असणाऱ्या मुख्य नाल्याचा प्रवाहात कचरा जात असून पावसाळ्यात नाला तुंबण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या घनकचरा हस्तांतरण प्रकल्पाच्या ठिकाणी वेळोवेळी जंतुनाशक व दुर्गंधी नाशक फवारणी ठेकेदाराकडून होत नाही. परिणामी कचऱ्याची दुर्गंधी पसरून त्याचा आजूबाजूच्या लोकवसाहतीतील नागरिकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट सुविधेसह वजन काटा व कंट्रोल रूम बांधणे आवश्यक असतानाही हे देखील काम अर्धवट अवस्थेतच आहे.  प्रकल्पाच्या ठिकाणी असणाऱ्या कॉम्प्रेसरची देखील मोठी दुरावस्था झाली असून या ठिकाणी लावण्यात आलेले पत्रे देखील उडून गेले आहेत.
या घनकचरा हस्तांतरण प्रकल्पामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही यंत्रणा देखील अपुरी आहे. तसेच प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रसाधन गृह, चेंजिंग रूम  या सुविधांची देखील कमतरता आहे. इतकेच काय तर, प्रकल्पाच्या कामकाजाकरिता हक्काचे अत्याधुनिक नियंत्रण कक्ष कार्यालय देखील याठिकाणी नाही. वायू प्रदूषण रोखण्यासाठी बफर झोन करणे आवश्यक असताना देखील ही सुद्धा सुविधा प्रकल्पाच्या ठिकाणी अस्तित्वात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
 ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा पालिका अधिकाऱ्यांचा प्रयत्न-
या हस्तांतरण केंद्र येथील अवस्था अतिशय बिकट असून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी फक्त बघ्याची भूमिका बजावत आहेत. घनकचरा विभागाचे आरोग्य अधिकारी आणि सहायक आयुक्त यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार केला जात असून यात पालिका आयुक्त यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे प्रयत्न घनकचरा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने केले जात आहे. हस्तांतरण स्थानकाच्य कामात पारदर्शकता दिसली नाही तर तीव्र आंदोलन करू. – स्वप्निल महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसे जनहित व विधी विभाग, ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -