ठाण्यातील महिला डायटिशियनला लावला ५७ लाखांचा चुना

अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्स अ‍ॅपवरून चुकून आलेल्या व्हिडिओला रिप्लाय देणे ठाण्यातील एका ३८ वर्षीय डायटिशियन महिलेला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ पाठवणार्‍या अनोळखी व्यक्तीने डायटिशियन महिलेला भूलथापा देऊन तिला ५७ लाख ६३ हजार रुपयांना गंडवल्याचा प्रकार ठाण्यातील घोडबंदर रोड येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहणारी ३८ वर्षीय महिला ही विवाहित असून ती तिच्या पतीपासून वेगळी राहत आहे. डायटिशियन असलेल्या या महिलेच्या मोबाईलच्या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर काही महिन्यापूर्वी विमान लँडिंगचा व्हिडिओ आला होता. अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ पाठवणार्‍या व्यक्तीला तिने हा कोणाचा नंबर आहे. आपण कोण आहात असे उत्तर दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीने चुकून व्हिडिओ पाठवला गेला असल्याचे सांगितले. त्याने त्याचे नाव रोहन राज असल्याचे सांगून अमिरात एअरलाईन्स मध्ये कॅप्टन असल्याचे सांगितले.

त्यानंतर काही दिवसांनी त्याच क्रमांकावरून मेसेज आला आणि त्यात त्याने या डायटिशियनच्या व्हॉट्स अ‍ॅपवर असलेल्या तिच्या फोटोचे कौतुक करून तुमचा फोटो मला खूप आवडला, असा इंग्रजीतून मेसेज करून दुसरा पर्सनल मोबाईल क्रमांक मागितला. मुंबईत आलो तर तुमची नक्की भेट घेईन, असे त्याने मेसेजमध्ये तिला सांगितले.

तिनेही त्याला नक्की भेटू म्हणून मेसेज पाठवला. त्यानंतर वारंवार दोघांचे संभाषण सुरु झाले आणि त्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली. तिनेही त्याला होकार दिला. तसेच त्याने स्वतःचे कर्नाटक, कुक येथे कॉफीची शेती असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान, या व्यक्तीने त्याचे क्रेडिड कार्ड ब्लॉक झाले असून तुझ्या कार्डचा नंबर पाठवा, असे या डायटिशियनला सांगितले. तिने त्याला तिच्या डेबिट कार्डचा फोटो त्याला पाठवला. त्यानंतर त्याने तिच्या खात्यावरून थोडे थोडे करून तब्बल ५७ लाख ६३ हजार रुपये एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. आपली फसवणूक होत असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने तिचे कार्ड बंद करून कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी राहुल राज रॉय नावाच्या व्यक्तीसह या महिलेला भेटण्यासाठी आलेला त्याचा मित्र अभिषेक शेट्टी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे.