गृहनिर्माण मंत्र्यांचे बनावट फेसबुक खाते तयार करणाऱ्या तरुणाला अटक

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बनावट फेसबुक खाते बनवून त्यात अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या तरुणाला ठाणे सायबर सेलच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून अटक केली आहे.

Jitendra-Awhad
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बनावट फेसबुक खाते बनवून त्यात अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या तरुणाला ठाणे सायबर सेलच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून अटक केली आहे. सुनील रायभान पवार उर्फ सुनील राजे (२८) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बीएससी शिक्षण पूर्ण करून एमआयडीसी परिसरात एका खाजगी कंपनीत सुपरवायझरची नोकरी करणारा सुनील रायभान याने एप्रिल महिन्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यात त्याने आव्हाड यांचे छायाचित्रे टाकून अश्लील भाषेचा वापर केला होता. याप्रकरणी ८ एप्रिल रोजी ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यचा तपास ठाणे सायबर सेलकडे सोपवण्यात आला होता.

सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. दरम्यान, सायबर सेलच्या पथकाने या गुन्हयाचा पाठपुरावा करून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून रविवारी सुनील रायभान या तरुणाला अटक केली. मार्च महिन्यात ठाण्यातील एका सिव्हिल इंजिनियरला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर पंधरा दिवसांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी अटक आरोपी सुनील रायभान याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे फेसबूकचे बनावट खाते तयार करून त्यांच्या बाबत अश्लील भाषा वापरली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा – राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी; पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता