आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास

विशेष पोस्को न्यायालयाचा निकाल

घराबाहेरून ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जंगलात नेत, तिच्या अत्याचार करणाऱ्या साजिद अस्लम कंकाळी (२६) याला ठाणे जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र आणि विशेष (पोक्सो) न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांनी सोमवारी दोषी ठरवत, दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.ही घटना ५ डिसेंबर २०१५ रोजी काशीमीरा पोलीस ठाण्याच्या घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले.

पीडित मुलगी ही सात वर्षीय असून सकाळच्या शाळेतून घरी आल्यावर आरोपीने तिला उचलून शेजारील जंगलात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. ती रडत जंगलात येत असल्याचे पाहून पीडित मुलीच्या आईने तिच्याकडे विचारणा केली. तेंव्हा तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला.याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत काशीमीरा पोलिसांनी आरोपीला त्याच दिवशी अटक केली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आले.

हा खटला अतिरिक्त सत्र आणि विशेष (पोक्सो) न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केले पुरावे आणि तपासलेले ११ साक्षीदारांची साक्ष ग्राहय मानून आरोपीला दोषी ठरवले. तसेच आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३६३ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार दंड आणि दंड न भरल्यास २० दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. तर पोस्को कायद्याच्या कलम ४ नुसार १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १०० दिवस साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच भारतीय दंड संहितेच्या ३२३ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवून ६ महिने सश्रम कारावास आणि १ हजार दंड आणि दंड न भरल्यास १० दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.