घर ठाणे कळवा खाडीतील ७० अनधिकृत बांधकामांवर कारवाई

कळवा खाडीतील ७० अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Subscribe

कळवा खाडीकिनारी भागाला अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपड्यांचा विळखा असल्याने खाडीकिनारी भागांचा विकास करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहे. तसेच दिवसेंदिवस खाडीकिनारा बुजविला जात असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी हानी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कळवा खाडीकिनारी क्रांती नगर भागात वसलेल्या ६५ ते ७० अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेने कारवाई केली. या कारवाईला स्थानिकांनी विरोध करीत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच अंगावर रॉकेल ओतून घेण्याचाही प्रयत्न केला. या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांचे ते प्रयत्न हानून पाडण्यात पोलिसांना यश आले.ही कारवाई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. तसेच अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यावर सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

मागील कित्येक वर्षापासून ठाण्याच्या दिशेने तसेच कळव्याच्या दिशेने असलेल्या बाजूने खाडीतच झोपड्या बांधल्याचे चित्र दिसून आले आहे. मधल्या काळात याची संख्या वाढली होती. या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई देखील केली गेली. मात्र पुन्हा नव्याने या भागात झोपड्या उभ्या राहताना दिसून आल्या आहेत. त्यात काही दिवसांपासून याठिकाणी झोपड्यांचे रुपांतर पक्क्या बांधकामात होऊन तळ अधिक एक मजल्यापर्यंत याठिकाणी महापालिकेच्या नाकावर टिच्चुन घरे उभी राहण्यास सुरवात झाली.तसेच तेथील घरांना विद्युत विभागाचे मीटर लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी ९ वाजता महापालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त शंकर पाटोळे, पोलीस परिमंडळ उपायुक्त गणेश गावडे, नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, अतिक्रमण, पाणीपुरवठा तसेच विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली.त्यातही यातील काही झोपड्या या मागील २० ते २५ वर्षापासून येथे असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कळवा खाडीतील ही अनाधिकृत बांधकामे देखील तीन प्रभाग समिती हद्दीत मोडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार गुरुवारी नौपाडा प्रभाग समितीने कारवाई केली. आता कळवा आणि उथळसर प्रभाग समिती शिल्लक झोपड्यांवर कारवाई करणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

कळवा खाडी पात्रात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर पालिकेने यापूर्वी देखील कारवाई करीत बांधकामे जमीनदोस्त केली होती. त्यात सन २०११ – २०१२ मध्ये येथील घरांचा सर्वे करण्यात आला होता. त्यावेळी पालिकेकडून येथील १४० रहिवाशांना पावती देखील दिली होती. त्यामुळे आता, या रहिवाशांना ट्रांझिस्ट कॅम्पमध्ये घरे देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -