घरठाणेचोरटी झाडतोड करून वाहतूक करणा-या लाकडांच्या ट्रकवर वनविभागाची कारवाई

चोरटी झाडतोड करून वाहतूक करणा-या लाकडांच्या ट्रकवर वनविभागाची कारवाई

Subscribe

नगर जिल्ह्यातून अनधिकृतपणे वृक्ष तोड आणि ट्रकमध्ये सुबाभूळची लाकडे आहेत असे भासवून इतर झाडांची लाकडे भरून मुरबाडमार्गे मुंबई येथे जाणाऱ्या ट्रकला ठाणे जिल्हा शेतकरी मालकी ठेकेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविल्याने वनाधिकाऱ्यांनी ट्रकसह विविध प्रकारची लाकडे जप्त करून कारवाई केली आहे. नगर, पुणे, बीड जिल्ह्यातील अनेक जंगलतोड ठेकेदार हे आपल्या विभागातील झाडेतोड करून त्यांची लाकडे ही मुंबई येथे पाठवत असतात. शासनाने एक आदेश काढून सुबाभूळ या प्रकारातील झाडांच्या तोडणी व वाहतुकीला कोणतीही परवानगीची अट ठेवली नाही. त्यामुळे काही जंगल ठेकेदार या आदेशाचा गैरवापर करून कडूनिंब सारख्या आयुर्वेदिक व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या व्रुक्षांची व आंबा, मोह,जांभूळ, ऐनची अवैधरित्या तोड करतात. आणि ते ट्रकमध्ये भरून वर फक्त दिसण्यासाठी थोडीशी सुबाभूळीची लाकडे भरतात.

मुंबई येथे येतांना लागणाऱ्या वन तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शासनाने सुबाभूळ संबंधी काढलेल्या आदेशाच्या प्रतीची झेरॉक्स दाखवून विनादिक्कत अनधिकृतपणे इतर झाडांची लाकडे वाहतूक करून विक्री करतात. ही माहिती ठाणे जिल्हा शेतकरी मालकी ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष कमलेश कुंदर, शेखर पांडव, आकाश अधिकारी या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी या अनधिकृतपणे व्रुक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या जंगल ठेकेदारांना बोलावून समजूत दिली. परंतु तरीही या जंगल ठेकेदारांनी अनधिकृतपणे झाडतोड सुरूच ठेऊन ही विविध प्रकारच्या झाडांची लाकडे सॉमिल मध्ये अनधिकृतपणे कापून ट्रकमध्ये भरून मुंबई येथे विक्री केली जात होती. याकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून पाळत ठेऊन अनधिकृतपणे झाडतोड करून नगर जिल्ह्यातून मुरबाडमार्गे मुंबई येथे वाहतूक करणारा ट्रक पकडून मामणोली येथील वनपाल रामदास गोरले, वनरक्षक रेखा गायकवाड, आर.के.गीते इ. कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला. यामुळे अनधिकृतपणे झाडतोड करणाऱ्या जंगल ठेकेदारांचे धाबे दणाणले असून वनाधिकारी अवैध तोड करणाऱ्या ठेकेदार व लाकडे कापणाऱ्या सॉ मिलवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

” पकडलेल्या ट्रकमध्ये अनधिकृतपणे तोडलेल्या विविध जातींच्या झाडांची कापलेली लाकडे असून ट्रक ड्रायव्हरच्या जबाबानुसार नगर येथील अनिल शिंदे या ठेकेदाराची ही लाकडे आहेत. ही लाकडे जप्त केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
-रामदास गोरले, वनपाल, मामणोली.

” वनविभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रोज अनेक ट्रक भरून सुबाभूळच्या नावाने इतर झाडांची कत्तल करून अवैधरित्या लाकडांची वाहतूक केली जाते. कडुनिंब सारख्या नैसर्गिक समतोल राखण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या झाडांचीसुध्दा अवैध तोड केली जाते. यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे.”
-कमलेश कुंदर,अध्यक्ष, ठाणे जिल्हा शेतकरी मालकी ठेकेदार संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -