घरठाणेखोणी गावातील ५५ वीजचोरांना कारवाईचा दणका

खोणी गावातील ५५ वीजचोरांना कारवाईचा दणका

Subscribe

मानपाडा पोलिसांच्या मदतीने महावितरणच्या पथकांची धडक कारवाई

वीजचोरी शोध मोहिमेवरील महावितरणच्या भरारी पथकावर बुधवारी हल्ला झालेल्या खोणी गावात महावितरणने पोलिसांच्या मदतीने गुरुवारी धडक कारवाई केली. या मोहिमेत ५५ ठिकाणी वीजचोरी, ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर, १९ ठिकाणी संशयास्पद मीटर आढळून आले आहेत. या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान हल्ल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. डोंबिवली नजिकच्या खोणीगाव येथे बुधवारी दुपारी महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला करण्यात आला होता. यात बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस कर्मचारी जखमी झाला होता तर महावितरणचे कर्मचारी-अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, दमदाटी करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिस व महावितरण अँक्शन मोड मध्ये आले.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या सहकार्याने गुरुवारी खोणी गावात धडक वीजचोरी शोध मोहिम राबवण्यात आली. महावितरणचे ११३ कर्मचारी, ३२ अभियंते, १५ सुरक्षारक्षक, १८ महिला कर्मचारी आणि बंदोबस्तासाठीचे ३० पोलिस कर्मचारी यांच्या २१ पथकांनी खोणी गावातील २५४ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. या तपासणीत ५५ जणांकडे थेट वीजचोरी, ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर तर १९ ग्राहकांकडील वीजमीटर संशयास्पद आढळले.

- Advertisement -

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करून मीटर काढलेले असताना तेथे थेट वीजचोरी, मीटरमध्ये फेरफार, मीटरकडे येणाऱ्या केबलला जॉईंट करून वीज वापराची नोंद मीटरमध्ये होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी, असे प्रकार तपासणीत आढळून आले आहेत. भ्याड हल्ल्यानंतर न डगमगता वीज चोरांविरुद्ध जोमाने कारवाई सुरू राहणार असल्याचा संदेश गुरुवारच्या धडक कारवाईतून महावितरण कडून देण्यात आला. उपसंचालक सुमीत कुमार, अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बागडे आणि पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार, सुनिल तारमाळे, अविनाश वणवे या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या परिसरात पोलिसांच्या सहकार्याने वीज चोरीविरुद्ध अधिक प्रभावीपणे कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -