ठाणे महापालिका आयुक्तांचा अलर्ट मोड

चोवीस तास मोबाईल सुरू ठेवण्याचा सूचना

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे आता ठाण्याकडे आल्याने महापालिका आयुक्त अलर्ट मोडमध्येच आहेत. आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या महापालिका अधिकार्‍यांच्या बैठकीत सर्व अधिकार्‍यांना सतर्क राहण्यासह 24 तास मोबाईल चालू ठेवा, तसेच शहर स्वच्छते बरोबर साफसफाई आणि इतर महत्वाच्या कामांना वेळच्या वेळी मार्गी लावा असे आदेश दिले आहेत. तसेच शहरातील रस्ता दुरुस्ती आणि खड्ड्यांची कामे आपल्या जबाबदारीने पूर्ण करावी, ती कामे मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौर्‍या पूर्वी करू नये, अशा सूचना ही या बैठकीत केल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका आयुक्तांनी सोमवारी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांची एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकार्‍यांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तर मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत, आणि ठाणे हे मुंबई पासून जवळ असल्याने ते कधी मुंबईत तर कधी ठाण्यात असणारच आहेत.

त्यामुळे ठाण्याच्या निमित्ताने त्यांचा नियोजीत दौरा असेल असे नाही ते केव्हाही ठाण्याला भेट देऊ शकतात आणि ठाण्याविषयी माहिती घेऊ शकतात, किंवा दौरे देखील करु शकतात. त्यामुळे प्रत्येक अधिकार्‍याने त्या दृष्टीकोणातून शहरातील विकास कामांना महत्व द्यावे, शहरातील साफसफाई, स्वच्छता यावर भर देण्यात यावा, शहराच्या विविध भागात वृक्ष उन्मळून पडणे, फांद्या पडणे आदीच्या घटना घडत असतात, परंतु वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन वृक्ष किंवा फांद्या तत्काळ हटविण्यात याव्यात अशा सुचनाही त्यांनी दिल्या. त्यातही शहरातील रस्ते दुरुस्तीवर तसेच पावसाळ्यात रस्त्यांवर पडणार्‍या खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची वाट पाहू नका असे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक अधिकार्‍याने आपआपले फोन हे 24 तास सुरुच ठेवावेत असे आदेशही त्यांनी दिले आहेत. अशा सुचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. असे विश्वनीय सूत्रांनी सांगितले.