लसीकरणात भेदभाव केल्याचा आरोप; ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उधळली महासभा

राष्ट्रवादी काँग्रेसच्याा आंदोलनानंतर सर्व नगरसेवकांना निधी देण्याची महापौरांची घोषणा

Allegations of discrimination in vaccination; NCP corporators disrupt general assembly in Thane
लसीकरणात भेदभाव केल्याचा आरोप; ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उधळली महासभा

राज्यात गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असलेल्या दोन पक्षांची खडाजंगी आज ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत पहायला मिळाली. आज ठाणे महानगरपालिकेची महासभाच्या ऑनलाईन माध्यमातून होत असताना आम्हाला बोलू दिले जात नाही आणि आमचा आवाज म्यूट केला जातो असा आरोप करत ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी थेट पालिका सभागृहात धडक दिली. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा आणि सत्ताधारी शिवसेनेतील सर्व नेत्यांना धारेवर धरले. यावेळी सत्ताधाऱ्यांना घेराव घालत गोंधळ करण्यात आला. कोरोनाच्या काळात लसीच्या वाटपाबाबत भेदभाव केला जातो व सत्ताधारी शिवेनेच्या प्रभागामध्येच या लसी दिल्या जातात तर राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रभागात लसींचा पुरवठा केलाच जात नाही असा आरोप देखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला.

 

बजेट आणि इतर मुद्द्यावर चर्चा करणे तर दूरच केवळ प्रश्न विचारला तरी आवाज म्यूट केला जातो त्यामुळेच आम्हाला इथे यावं लागलं असे विरोधी पक्ष नेते शानू पठाण म्हणाले. तर विरोधीपक्ष नेत्यांना असे वागणं शोभत नाही असा आरडाओरड करणे हे चुकीचे आहे ,याच निषेध करतो आणि कोणतीच विकास कामे अडली नाहीत सर्वच कामे सुरु आहेत ,विरोधीपक्षाने आपली बाजू शांतपणे मांडली पाहिजे. हे करण्यात विरोधीपक्षनेते कमी पडत आहेत असा टोला सेनेच्या नगरसेवकांनी यावेळी लगावला.अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत नाही. तसेच, दूषीत पाणीपुरवठा प्रकरणीं स्टेमच्या अधिकार्‍यांवरील कारवाई, स्मशानातील भ्रष्टाचार, लसीकरणातील दुजाभाव, नगरसेवकांची कामे या प्रकरणी ठाणे पालिका आयुक्तांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत २ ऑगस्ट रोजी पालिका मुख्यालयात आंदोलन केले होते.

 

हे ही वाचा- दिल्लीत मोदीविरोधक नाही तर सर्व भ्रष्टाचारी एकत्र येत आहेत; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे वक्तव्य

त्यावेळी आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. महासभा सुरु असतानाच प्रशासनाला लक्ष्य करणार्‍याा नगरसेवकांचे आवाज प्रशासनाकडून म्यूट केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये घोषणाबाजी करीत प्रवेश करुन महासभा उधळून लावली. विशेष म्हणजे या आंदोलनात एमआयएमचे नगरसेवकही सहभागी झाले होते. लसीकरण हे ठामपाच्या अधिपत्याखाली होणे गरजेचे असताना सत्ताधार्‍यांच्या दबावापुढे झुकून प्रशासन ठराविक भागातच लसीकरण मोहीम राबवित आहे. तर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मागणी करुनही लसीकरण शिबिर राबविण्यात येत नाही. स्थायी समितीच बेकायदेशीर आहे, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करावी, लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवावी,या मागण्यांसाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन केले. या आंदोलनानंतर महापौरांनी, नगरसेवक निधीचे १२.५ आणि प्रभाग विकास निधीचे ५० लाख देण्याबाबत लवकरच ठराव पारीत करण्यात येणार असून हा निधी लवकरच वितरीत करण्यात येईल असे आश्वासन दिले.

 

ठाणे शहरात सध्या प्रशासनाची मनमानी सुरु आहे. अशा स्थितीमध्ये नगरसेवकांची कामे रखडविण्यात आलेली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातच लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सबंध शहरात पूरस्थिती आलेली असताना कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील पंचनामे करण्यात आलेले नाहीत. स्टेममधून होणार्‍या दुषित पाणी पुरवठ्याबाबतचे पुरावे सादर करुनही कारवाई करण्यात आलेली नाही. स्मशान आणि दफनभूमीमध्ये ठेकेदारांकडून भ्रष्टाचार सुरु आहे. त्याचेही पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. मात्र, पालिका आयुक्तांकडून कारवाई होत नाही. याकडे प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले. जर, चुकीचे घडत असले तर पालिका आयुक्तांनी ते योग्य करणे गरजेचे असतानाही आयुक्तांकडून अशी कृती केली जात नाही.

 

लसीकरणाच्या चार व्हॅन असताना त्या ठराविक भागातच पाठविल्या जात आहे. प्रशासनाकडूनच नगरसेवकांचे आवाज म्यूट केले जात आहेत. लसीकरणात प्रशासनाकडूनच घोळ घातले जात आहेत. प्रशासनाकडून र्साांना समान संधी देण्याची तरतूद असतानाही प्रशासन जर कोणाच्या सांगण्यावरुन आवाज म्यूट केला जात असेल तर तो संविधानिक अधिकारांचे हनन होत असल्यामुळे आम्हाला आज आंदोलन करावे लागत असल्याचे सांगत प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांनी सत्ताधार्‍यांवर तसेच प्रशासनावर टीकेचा आसूड ओढला. सध्याचा स्थायी समिती बेकायदेशीर असून स्थायी समितीची तत्काळ निवडणूक घेण्याची मागणी देखील देसाई यांनी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहील्याने महासभेत चांगलाच गोंधळ उडाला.

 

हे ही वाचा-मुंब्य्रातील लसींचा काळाबाजार; केंद्रप्रमुख डॉक्टरावर निलंबनाची कारवाई