वेगात रिक्षा चालवल्याने अपघात

पत्नीचा मृत्यू तर ४ जखमी

accident

भरघाव वेगाने रिक्षा चालवून स्टंटबाजी करणे रिक्षाचालकाला महागात पडले. यावेळी रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात त्याची पत्नी ठार झाली. स्वतः रिक्षाचालक, त्याचा मुलगा आणि २ महिला देखील या अपघातात गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील दुर्गादेवी पाडा परिसरात जॉनी फ्रान्सिस हा रिक्षाचालक त्याच्या कुटुंबियांसह राहतो. जॉनीची पत्नी रेश्मा फ्रान्सिस ही आनंदनगर, एमआयडीसी,अंबरनाथ ( पूर्व ) येथील  एका चॉकलेट  कंपनी मध्ये काम करीत होती.
शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास   रेश्मा कंपनीतून घरी येण्यासाठी निघाली तेव्हा तिला घेण्यासाठी जॉनी रिक्षानेकंपनीजवळ आला. यावेळी  त्याचा मुलगा पंकज हा देखील सोबत होता. ‘

जॉनीने कंपनीजवळ रिक्षा थांबवली. त्यानंतर रिक्षामध्ये त्याची पत्नी रेश्मा,  तिच्या मैत्रिणी लीला रसाळ, छाया खोरे या रिक्षामध्ये बसल्या, यावेळी रिक्षा चालविणाऱ्या जॉनीजवळ म्हणजे फ्रंटसीटवर तो व त्याची पत्नी रेश्मा तर मागील सीटवर त्याचा मुलगा पंकज आणि रेश्माच्या मैत्रिणी लीला आणि छाया बसले होते. दरम्यान भरघाव वेगाने रिक्षा चालविणाऱ्या जॉनीचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा पलटी होऊन अपघात झाला.

या अपघातात रेश्मा फ्रान्सिस हिच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर स्वतः रिक्षाचालक जॉनी फ्रान्सिस त्याचा मुलगा पंकज,  रेश्माच्या मैत्रिणी लीला आणि छाया या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी छाया खोरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक जॉनी फ्रान्सिस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोचरेकर हे करीत आहेत.