रेल्वेचा मेगाब्लाॅक ठाणे पालिका परिवहन सेवेच्या पथ्यावर

मेगाब्लॉकमुळे ठामपा परिवहन सेवेच्या तिजोरीत रविवारी अतिरिक्त तीन लाखांचे उत्पन्न 

ठाणे ते दिवा रेल्वे स्थानक दरम्यान घेण्यात आलेल्या ३६ तासांच्या मेगाब्लॉकमुळे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने जादा बसेसचे नियोजन केले होते. त्यामुळे रविवारी दिवसभरात ठामपा परिवहन सेवेच्या तिजोरीत अतिरिक्त तीन लाखांचे उत्पन्नाची भर पडली. रविवारी ठाणे मुंब्रा येथे २५० तर ठाणे दिवा या मार्गावर  १०२ फेऱ्या झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.
 रेल्वे विभागाकडून शनिवार ८ जानेवारी, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासुन ते सोमवार १० जानेवारी, २०२२ रोजी पहाटे ०२.०० वाजेपर्यत अभियांत्रिकी कामांसाठी विशेष मेगाब्लॉक घेतला होता. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये,यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी ५ मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात २३० बसफेऱ्या आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा या मार्गावर १० मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात १०२ बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार ठाणे- मुंब्रा मार्गावर २० फेऱ्या अतिरिक्त झाल्या आहेत. या फेऱ्यांसाठी ज्या मार्गावर रविवारी गर्दी नसते त्या फेऱ्या ठाणे-मुंब्रा आणि ठाणे – दिवा या मार्गांवर वळविण्यात आल्या होत्या. रविवार पेक्षा शनिवारी बसेसला गर्दी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रविवारी दिवसभराचे उत्पन्न हे १७ लाख ७१ हजारांवर गेले असून त्यामध्ये या दोन मार्गांवर नियोजित केलेल्या फेऱ्यांमुळे अतिरिक्त तीन लाखांचे उत्पन्न वाढल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
 वाढत्या कोरोनामुळे उत्पन्नही घसरले
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोनाचा फटका ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या उत्पन्न झाल्याचे दिसून आले आहे. परिवहनच्या ताफ्यातील दररोज २७० बसेस धावत असल्याने त्यातून दररोजचे उत्पन्न २१ ते २२ लाखांच्या घरात होते. तर रविवारचे उत्पन्न १६ लाखांच्या आसपास होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे हे १९ ते २० लाखांवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
७२ तासांच्या मेगाब्लॉकमुळे आतापासूनच चिंता
या पुढे ठाणे ते दिवा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या ७२ तासांच्या मेगाब्लॉकमुळे ठाणे महापालिका परिवहन सेवेवर अतिरिक्त ताण येणार आहे. यासंदर्भात परिवहन सदस्यांमध्ये चर्चा झाली असून या मेगाब्लॉकच्या वेळी बंद असलेल्या शाळांच्या बसेसचा वापर करावा. तसेच त्या दिवसात नागरिकांना भरपगारी सुट्टी द्यावी अशा काही सुचना पुढे आल्या असून त्या पालकमंत्र्यांसमोर ठेवल्या जाणार असून याबाबत आता पालकमंत्री काय निर्णय घेतील हेच पाहावे लागणार आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली.