घरठाणेआनंद दिघे यांच्या ठाण्यातील स्मारकाचे झाले काय

आनंद दिघे यांच्या ठाण्यातील स्मारकाचे झाले काय

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा मुंबईत पुतळा उभारला. मात्र,गेल्या कित्येक वर्षांपासून ठाण्यात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावे मतांचे राजकारण सुरू आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा मुंबईत पुतळा उभारला. मात्र,गेल्या कित्येक वर्षांपासून ठाण्यात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावे मतांचे राजकारण सुरू आहे. तरी सुद्धा त्यांच्या निधनानंतर ठाण्यात त्यांचे दिमाखदार स्मारक उभे राहू शकलेले नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना करणाऱ्या शिवसेनेला एके काळातील लहान भाऊ असलेल्या भाजप आणि मनसे या पक्षांनी कोंडीत पकडण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. स्मारकावरून विरोधक सेनेची कोंडी करू पाहत असताना शिवसेनेकडून अद्यापही कोणत्याही प्रकारे अधिकृत भाष्य केले गेले नसल्याने फक्त मतांसाठी दिघे यांचे नावे घेतले जात असल्याची कूजबूज ठाणे शहरात सुरू झाली आहे.

ठाणे म्हटले तर आनंद दिघे यांचे नाव पहिले घेतले जाते. तसेच ठाणे आणि दिघे हे एक समीकरण होऊन बसल्याने त्यांच्या नावाने प्रत्येक निवडणुकांमध्ये मतांचे राजकारण जोरात होते. दिघे यांच्या अकस्मात निधनानंतर अवघ्या सहा महिन्यात ठाण्यात एक स्मारक व्हावे, असा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र त्या प्रस्तावाला हिरवा कंदील न मिळाल्याने हे स्मारक उभे राहू शकले नाही. याचदरम्यान दिघे यांच्या कट्टर समर्थकांनी त्यांचे स्मारक काही ठिकाणी चौकात उभारले. त्यातच नुकतीच दिघे यांच्या टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमाची डागडुजी केली गेली आहे. दिघे यांच्या निधनानंतर दशकांचा कार्यकाळ लोटला गेला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आगामी कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई या महापालिकांसह अंबरनाथ आणि कुळगाव- बदलापूर या नगरपालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर, वर्षभराने ठाणे महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांमध्ये स्व. दिघे यांच्या नावे मते घेणा-या शिवसेनेला वेळीच रोखण्यासाठी ही चाल मनसेने केली. यामध्ये मनसेने ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान ठाण्यातील जांभळी नाका परिसरात असलेल्या उंच घड्याळ्याच्या मनो-याच्या जागेवर दिघे यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करत यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांचा नगरसेवक निधी या कामी घेण्यात यावा अशी सूचनाही करण्यात आल्या.

ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांचे नाव हे कायम स्मरेणात राहणारे आहे. त्यांचे सर्व पक्षीयांबरोबर चांगले नाते होते. चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे त्यांचे स्मारक या ठाण्यात व्हावे अशी इच्छा असल्याचे मनसेने स्पष्ट केले. दिघे यांच्या स्मारकासाठी निधी मिळत नसला तर मनसेचे पदाधिकारी यासाठी घरोघरी जाऊन निधी गोळा करतील, असे ही मनसेने स्पष्ट केले. तर दिघे यांची आठवण शिवसेनेला केवळ निवडणुकीपूर्तीच होत असते. मात्र इतर वेळेस त्यांचा विसर पडत असल्याचा आरोपही केला. त्यानंतर, गुगली टाकून हाच मुद्दा भाजपने हाती घेतला आहे. ठाण्यात आनंद दिघे यांच्या स्मारकासाठी यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करावी अशी प्रस्तावाची सूचना केली आहे.

- Advertisement -

दिघे यांचे सामाजिक कार्य हे उल्लेखनीय होते. जिल्ह्यातील अनेक राजकीय मंडळींसाठी ते हक्काचा आधार होते. जिल्ह्यातील विकासात सामान्य जनतेचा जनाधार म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यामुळेच त्यांचे स्मारक व्हावे अशी इच्छा भाजपने व्यक्त केली. या स्मारकासाठी २०२१-२२ मध्ये ५० कोटी आणि २०२२-२३ मध्ये ५० कोटी अशा दोन टप्यात या निधीची तरतूद करावी अशी मागणीही भाजपने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मनसे आणि भाजपच्या मागणीनंतर अजूनही शिवसेनेने स्मारकाबद्दल अधिकृतरित्या एक चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजप आणि मनसेने केलेल्या दिघे यांच्या स्मारक मागणीवरून ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून हे स्मारक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय होऊन बसला आहे.

या स्मारकावरून मतांचे राजकारण की दिघे यांच्यावरील असलेली निष्ठ हा मुद्दा पुढे केल्याने आगामी काळात स्मारकावरून कोण बाजी मारणार किंवा स्मारकाची उपेक्षा कायम राहणार हेच पाहावे लागणार आहे. दिघे यांनी अनेक शिवसैनिकांना मोठी पदे देऊ केली. मात्र त्याच नेत्यांकडून दिघे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला न्याय देऊ शकले नसल्याने त्यांचे कुटूंब उपेक्षित राहिले आहे. कुटुंबाप्रमाणे दिघे यांचे स्मारकही उपेक्षित राहते की काय अशीच दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. तर स्मारक झाल्यावर हे स्मारक नेमके कोणाचे, हा प्रश्नही निर्माण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -