अंगणवाडी सेविकांचा शहापूर ते ठाणे पदयात्रेचा ठाण्यात समारोप

पदयात्रेत जिल्ह्यातील ३०० अंगणवाडी सेविका सहभागी

शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, दरमहा अर्ध्या पगाराएवढी पेन्शन द्या, मानधनवाढीच्या आश्वासनाची पूर्तता करा, सुसज्ज अंगणवाडी केंद्रे द्या. कार्यक्षम मोबाईल द्या आदी मागण्यांसाठी तीन दिवस चाललेल्या शहापूर ते ठाणे अशी पदयात्रा अंगणवाडी सेविकांनी काढली होती. या पदयात्रेचा समारोप ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला असून त्या पदयात्रेत जिल्ह्यातील ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्ह्यातील सुमारे दीड हजार अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदविला होता. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना अंगणवाडी सेविकांनी मागण्यांचे निवेदन दिले.

​महाराष्ट्रातील तसेच पालघर व ठाणे जिल्हयामध्ये बालकांमध्ये बालमृत्युचे व कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. सध्या अंगणवाडीतील लाभार्थीना दररोज शासनाकडून आठ रुपयाचा पुरक पोषण आहार २०१८ सालापासुन दिला जातो. एवढया रक्कमेमध्ये योग्य ते पोषण होऊ शकत नाही. गेल्या पाच वर्षात महागाई दुप्पटी-तिप्पटीने वाढली आहे. त्यामुळे पुरक पोषण आहारामध्ये दुप्पटीने तरी वाढ केली पाहिजे. त्याचप्रमाणे लाभार्थ्याना टीएचआर दिला जातो. तो निष्कृष्ट दर्जाचा असतो, म्हणुन लाभार्थ्यांना टीएचआर न देता, गरम व ताजा आहार द्यावा, अशी मागणी आहे. केंद्र सरकारने महिला व बालविकास विभाग खात्याच्या बजेटमध्ये अपुरी तरतूद केली आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांना योग्य सेवा पुरविल्या जाऊ शकत नाही. अंगणवाडी सेविकांना २०१९ मध्ये अंगणवाडीचे कामकाज करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते व ते बंद पडले आहे. त्यामुळे त्यांना विनाविलंब मोबाईल मिळणे, आवश्यक आहे. नवीन मोबाईल देणे, पदोन्नती, अंगणवाडीचे केंद्राचे नोव्हेंबर २०२१ पासुनचे थकित भाडे, थकित टीएडीए व श्रीमती. कमल वारे यांना मा. कामगार व औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार पुर्ववत कामावर घेणे आदी प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी शहापूर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा अंगणवाडी सेविकांनी काढली होती. या पदयात्रेला बुधवार २२ फेब्रुवारी रोजी शहापूर येथून सुरुवात झाली. या पदयात्रेत ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. तीन दिवस चालेल्या या पदयात्रेचा शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला.