उल्हासनगरात उद्धव ठाकरे गटाला पुन्हा हादरा

शहरप्रमुखांसमवेत कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत

उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख दिलीप गायकवाड त्यांच्या असंख्य समर्थकांसोबत शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे उल्हासनगरात ठाकरे गटाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी शहर प्रमुख दिलीप गायकवाड यांच्यासोबत त्यांची पत्नी माजी नगरसेविका ज्योती गायकवाड, विभाग संघटक सुनील दबडे, उपविभाग प्रमुख हरिश्चंद्र ओवळेकर, उपशहर संघटक आनंद सावंत यांच्यासमवेत अन्य शिवसैनिकांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र भुल्लर, उप जिल्हा प्रमुख अरुण आशान उपस्थित होते.

यापूर्वी माजी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. राजेंद्र चौधरी यांच्यसोबत माजी नगरसेवक, समवेत सर्व शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, शिवसेना प्रणित कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, महिला आघाडी समवेत शेकडो शिवसैनिकांनी शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. चौधरी शिंदे हे गटात जाताच त्या वेळी उद्धव ठाकरे गटाने तातडीने माजी नगरसेवक दिलीप गायकवाड यांना उल्हासनगर पश्चिमचे शहर प्रमुख बनवले होते. गायकवाड हे धनंजय बोडारे यांचे निकटवर्तीय समजले जात होते. परंतु राजेंद्र चौधरी यांनी त्यांची समजूत काढून त्यांना शिवसेना शिंदे गटात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचे समजते.

दिलीप गायकवाड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे शिवसेना कॅम्प एक ते पाचपर्यंत मजबूत झाली असून आता ठाकरे शिवसेना गटात कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे त्यांचे बंधू माजी नगरसेवक धनंजय बोडरे राहिले आहेत. त्यांना देखील शिंदे गटात घेण्याची कवायत सुरु असल्याचे समजते. परंतु बोडारे बंधू यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.