घरठाणेपोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र, ठाणे पोलीस दल राज्यात ठरले प्रथम

पोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र, ठाणे पोलीस दल राज्यात ठरले प्रथम

Subscribe

कोरोना आजाराने मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या पाल्यांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते नियुक्ती पत्र

कोरोनाच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या ठाणे पोलीस दलातील ३३ पोलीस तसेच दोन वर्षात मृत्यू झालेल्या पोलीस अश्या एकूण ७४ पोलीस पाल्यांना पोलीस दलात अनुकंप तत्वावर सामावून घेण्यात आले असून त्यांना शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले ठाणे पोलीस दल हे राज्यातील पहिले पोलीस दल असून लवकरच राज्यभरात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या पाल्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम घेण्यात येईल असे राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी यावेळी म्हटले.

कोरोनाचा काळ हा पोलीस दलासाठी भीषण काळ होता. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तलयातील सुमारे ३३ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोना या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. या शहीद झालेल्या पोलिसांच्या पाल्यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना लवकरात लवकर अनुकंप तत्वावर पोलीस दलात सामावून घेण्याचा निर्णय तसेच कुटुंबाला ५०लाख रुपायाची मदत जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तलयाकडून या शहिदांच्या पाल्यांना पोलीस दलात सामावून घेण्यासाठी तात्काळ पाऊले उचलली गेली. मागील दोन वर्षात ठाणे पोलीस दलात मृत्युमुखी पडलेले आणि आणि कोरोनाच्या काळात शहीद झालेल्या पोलिसांच्या पाल्यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या ७४ जणांना नियुक्तीपत्र देण्यासाठी शुक्रवारी ठाणे पोलीस दलाकडून छोटेखानी कार्यक्रम ठाण्यातील साकेत मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान राज्य पोलीस दलाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते शुक्रवारी ७४ जणांना नोकरीत सामावून घेण्यात आल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कोरोना काळात राज्यातील सर्वच पोलिसांनी उत्कृष्ट कार्य करून एक आदर्श उभा केला आहे. मात्र, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात मोठ्या संकटाशी सामना केला आहे. या शहरातील स्थलांतरित मजूर यांना घरी पोहचवणे असो वा रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणणे असो अशी सगळीच आव्हाने पोलिसांनी मोठ्या धीराने पार पाडली आहेत. या सर्व पोलिसांचे मी मनापासून कौतुक करतो असे यावेळी पोलीस महासंचालक नगराळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. ठाणे पोलिसांनी शहीद पोलीसांच्या नातेवाईकांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याचा उपक्रम आयोजित करून एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. ठाणे पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाप्रमाणेच संपूर्ण राज्यात असा उपक्रम राबविला जाईल असे आश्वासन देखील पोलीस महासंचालकांनी यावेळी दिले.

तसेच तामिळनाडू व इतर राज्यात सुरू करण्यात आलेल्या चीफ मिनिस्टर कोरोना वारीयर्स मेडल सम्मान योजने प्रमाणेच महाराष्ट्रात देखील असे मेडल देण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे देखील नगराळे यांनी यावेळी सांगितले. तर ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कोरोना काळात झुंज देणाऱ्या प्रत्येक पोलिसांचे कौतुक केले. कोरोना काळात शहीद झालेल्या पोलिसांमुळे पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून येण्यासारखे नाही. मात्र, आपला माणूस गेल्यानंतर पोलीस विभागाशी असलेली नाळ तुटू नये अशी अनेक पोलीस कुटुंबियांना अशा होती. ही आशा पूर्ण करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. त्याच आश्वासनाची आज पूर्ती होतेय असे फणसळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -