उल्हास नदीतील पूल पाण्याखाली

आपटी-रायता रस्ता पाण्यात, रायते-मानिवली रस्ता बंद

कल्याण तालुक्यात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे तालुक्याची जीवनवाहिनी ठरलेली उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. टिटवाळा जवळील काळू नदीवरील रुंद पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उल्हास नदीत आलेल्या पुरामुळे अम्मू रिसॉर्ट येथे पाणी भरल्याने आपटी रायता रस्ता पाण्यात गेला आहे. तर मानिवली रस्त्यारील नाला पूर्ण भरल्याने हा मार्ग देखील बंद झाला आहे. एकूणच काय तर या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे. कल्याण नगर मार्गावरील या नदीवरील रायते पूल कमानीच्या लेवलपर्यंत भरला आहे. परंतु काळू नदीवरील रुंदा येथील पूल सकाळीच पाण्याखाली गेल्याने टिटवाळा ते फळेगाव हा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

बारवी आणि उल्हास नदीच्या पाण्यामुळे आपटी रायते रस्त्यावर अम्मू रिसॉर्ट येथे पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतूक मांजर्ली गावाच्या मागील बाजूने सुरू झाली होती. हा परिसर सखल असल्याने येथे प्रत्येक वर्षी पाणी भरत असते. तर रायते मानिवली रस्त्यावर संत आसाराम बापू आश्रमासमोर नाला तुंडूब भरल्याने हा मार्ग बंद झाला आहे.
या भागात येण्यासाठी घोटस, संतेचा पाडा किंवा बल्याणी, उंबार्णी, मोहना गेट या पर्यायी मार्गाचा अवलंब करताना वाहनचालक दिसत होते. पुरेसा पाऊस पडल्याने तालुक्यातील काही गावामध्ये भातलावणीचे काम देखील सुरू असल्याचे चित्र दृष्टीस पडत होते.

या पावसामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ पाडा, वरप, कांबा, पावशेपाडा, पाचवामैल येथील रस्त्याची मात्र पुरती वाईट अवस्था झाली आहे. आतापर्यंत अनेक अपघात झाले असून अनेकांना, पाठदुखी, मानदुखी आदी मणक्याचे आजार उद्भवू लागले आहेत. तर मोटारसायकल सह रिक्षा, ट्रक आदी वाहने रस्त्यातच बंद पडून वाहतूक कोंडी होत आहे.