शहापुरात कारसह मोटारसायकल आगीत खाक

नेक्सॉन मोटार कारला व मोटारसायकलला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.   

Ashes in motorcycle fire with car in Shapur
शहापुरात कारसह मोटारसायकल आगीत खाक
शहापूर तालुक्यातील वासिंद साईनाथ नगर येथील सिद्धी पार्क मध्ये मध्ये मध्य रात्रीच्या सुमारास एका कारसह  मोटारसायकल आगीत खाक झाल्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की अज्ञातांकडून लावण्यात आली काय ? याबाबत तर्क वितर्क लढविले जात असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. या घटनेमुळे शहापूर तालुक्यातील नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तथापि या प्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम व्यवसायिक असलेले राजेंद्र लक्ष्मण फापे हे वासिंद येथे सिध्दी पार्क येथे राहतात. त्यांच्या मालकीची टाटा कंपनीची नेक्सॉन मोटार कारला व एका युनिकॉन मोटारसायकलला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.
या घटनेत मोटार कार जळून खाक झाली आहे. ही घटना शनिवारी पहाटे मध्यरात्री २.४२ च्या  सुमारास घडली. राजेंद्र लक्ष्मण फापे हे झोपलेले असतांना अचानक इमारती बाहेर स्फोट झाल्याचा आवाज आला. यावेळी इमारतीसह आजूबाजूचे रहिवासी खडबडून जागे झाले.रहिवाशांनी घरातून बाहेर धाव घेतली असता फापे यांच्या मालकीची एक कार व मोटारसायकलला आग लागल्याचे दिसून आले.यावेळी प्रसंगवधान राखत सिद्धी पार्कमधील सर्वच रहिवासीयांनी घरातील पाणी आणून शर्तीचे प्रयत्न करीत कशीतरी ही आग विझविली. वेळीच रहिवासींच्या सतर्कतेमुळे तात्काळ आग विझविण्याचा आली अन्यथा कार लगत असलेल्या आणखी वाहनांना आग लागून आगीत कारच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला असता व सर्वत्र आग लागली असती. तर मोठा घातपात झाला असता.

परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून तसेच रांगेत उभ्या असलेल्या इतर कोणत्याही कारला ही आग लागली नाही. अन्यथा सिद्धी पार्क मध्ये होत्याचे नव्हते झाले असते, असे या घटनेनंतर घाबरलेल्या रहिवाशांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणी राजेंद्र फापे यांनी वासिंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कारला लागलेली आग ही  शॉर्टसर्किटमुळे लागली असावी,असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे.परंतु वाहनास लावलेली आग अज्ञांताकडून लावली गेली असावी अशी चर्चा सर्वत्र आहे. वासिंद पोलसही त्या दिशेने आता तपास करीत आहेत.

कार व मोटारसायकलला लागलेल्या आगी प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून इमारती जवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटने संदर्भात काही धागेदोरे हाती लागतात का त्या दिशेने आमचा तपास वेगाने सुरु आहे.

-सुदाम शिंदे (पोलीस निरीक्षक, वासिंद पोलीस ठाणे)