घरठाणेगणपत गायकवाड यांच्याकडून तपासात सहकार्य 

गणपत गायकवाड यांच्याकडून तपासात सहकार्य 

Subscribe

ठाणे क्राईम ब्रांचचे पथक द्वारली गावात

उल्हासनगर। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणी आता पोलिसांच्या तपासाला वेग आला  आहे. ठाणे क्राईम ब्रांचचे एक पथक सोमवारी द्वारली गावात जाऊन ज्या जमिनीवरून वाद झाला त्या जमिनीची पाहाणी अधिकार्‍यांनी केली. गणपत गायकवाड यांनी त्यांच्या काही समर्थकांचे नावे क्राईम ब्रांचला दिली असून ते तपासात सहकार्य करत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी ठाणे क्राईम ब्राचंच्या पोलिसांनी जागेसंबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली. जागा कुणाची आहे आणि नेमका वाद काय होता? याबाबतची माहिती घेण्याचे काम पथकाकडून करण्यात आले. याच जागेवर आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने 30 आणि 31 जानेवारीला भिंत बांधण्याचे काम सुरू होते. त्यावेळी जमीन मालकांनी गायकवाड यांना विरोध केला. याविषयीचा आमदार गणपत गायकवाड आणि स्थानिक महिलांच्या संभाषणाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एकनाथ जाधव कुटुंबियांच्या महिला संबंधित जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करीत होत्या.
क्राईम ब्रांचचे पथक द्वारली गावातून जागेची पाहणी केल्यानंतर उल्हासगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झाले. अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उल्हासनगर क्राईम युनिट 4 चे वरिष्ठ अधिकारी राजू सोनवणे, कल्याण क्राईम ब्रांच टीम, ठाणे क्राईम ब्रांचचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात फरार आरोपींचा शोध कशाप्रकारे करावा, यासाठी क्राईम ब्रांच अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि व्हिडिओमध्ये दिसणार्‍या आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी सहा विशिष्ट टीम बनवल्या गेल्या असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ठाणे गुन्हे शाखा पथकाने या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार चैनू जाधव यांची चौकशी सुरू केली आहे.
गायकवाड पार्टनर होते?
जाधव नावाच्या जागामालकाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित जागा ही पावणे पाच एकर आहे. ही जागा 1996 मध्ये विकण्यात आली होती. संबंधित जागा ही आधीच्या जागा मालकाने प्रमोद रांका यांना विकली होती. त्यांनी आमचा आजपर्यंत व्यवहार पूर्ण केलाच नाही. नंतर पैसे देऊ, असे म्हणत आमचे पैसे रखडवले. त्यांनी अर्धेच पैसे दिले होते. आमदार गणपत गायकवाड हे रांका बिल्डरच्या माध्यमातून पार्टनर म्हणून पुढे आले. ते आमच्या शेतावर येऊन थेट भिंत बांधायला लागले. त्यांनी एवढे वर्ष सातबारा रांका यांच्या नावावर केला नाही आणि आता लगेच कसे झाले? असा सवाल करीत हे राजकीय दबावामुळे झाले असल्याचे जवाब जाधव कुटुंबियांनी दिला.  आम्ही दाद मागायला गायकवाड यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी गायकवाड यांनी आश्वासन दिले की, तुम्हाला न्याय मिळवून देतो किंवा सेटलमेंट करुन देतो. पण त्यांनी तसे काही केले नाही. याउलट त्यांनी महेश गायकवाड यांच्यावर हल्ला केला, अशी प्रतिक्रिया मूळ जमीन मालकाने पोलिसांना दिली. ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -