प्लास्टिक विरोधी कारवाई करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पथकावर हल्ला

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील वर्तकनगर प्रभाग समितीमधील समता नगर येथे शनिवारी (४ मार्च) सिंगल यूज प्लॅस्टिक पिशवी प्रतिबंध मोहिमतंर्गत कारवाई करण्यास गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकावर दुकानदाराने हल्ला केला असून याप्रकरणी बाळाराम देवासी याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या भ्याड हल्ल्याचा महापालिकेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा – मला आणि योगेशला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

शनिवारी दुपारी उपमुख्य स्वच्छता निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दीपेश मंत्री आणि समीर डोळे (स्वच्छता निरीक्षक) आणि उस्मान खान (सफाई कामगार) यांचे पथक समता नगर भागातील रस्त्यावर पडलेला कचरा, कचरा फेकणारे नागरिक आणि बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करत असताना त्यांना भैरी भवानी सुपर मार्केट या दुकानात प्लास्टिक पिशव्या, प्लस्टिक चमचे आणि इतर बंदी असलेले प्लास्टिक साहित्य या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड करणारी पावती तयार केली. मात्र दुकान मालक बाळाराम देवाशी यांने कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांना दमदाटी केली. अधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठेवलेले दुकानातील साहित्य जप्त करण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाला बोलावले असता, बाळाराम देवासी यांने अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून कुंडी फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात उपमुख्य स्वच्छता निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्वच्छ रस्त्यांसाठी ठेकेदारांना दंड
ठाणे शहरातील रस्ते सफाईच्या कामात सुधारणा झाली नाही तर नवीन निविदा प्रक्रियेतून ठेकेदारांना बाहेर जावे लागेल, तसेच रस्ते स्वच्छ झाले नाहीत, रस्त्यांना खड्डे पडल्यास जसा दंड आकारणे प्रस्तावित आहेत, तसाच दंड केला जाईल, असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ठेकेदारांना देतानाच कामात सुधारणा करण्यासाठी अखेरची संधी दिली आहे.

हेही वाचा – शरद पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे…”