घरठाणेकसार्‍याजवळ धावत्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बाळाचा जन्म

कसार्‍याजवळ धावत्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बाळाचा जन्म

Subscribe

वेळीच मिळालेल्या मदतीमुळे आई, बाळ सुखरूप

मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये एका गरोदर मातेने धावत्या गाडीत एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही सुखद घटना गुरुवारी घडली. या अनोळखी मातेच्या मदतीसाठी मात्र कसारा रेल्वे स्थानकात अनेक माता-भगिनी वेळीच धावल्या. आई आणि बाळाला तातडीने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. माता आणि बाळाची प्रकृती सुखरुप असल्याचे सांगण्यात आले.

गुरुवारी सकाळी गोरेगाव येथे राहणारे राजाबाबू दास हे आपल्या गरोदर पत्नीसह आपल्या मूळ गावी कोलकाता येथे जाण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आले. त्यांनी येथून मुंबई हावडा गीतांजली एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. गीतांजली एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानक सोडल्यावर गाडी खर्डी रेल्वे स्थानक सोडून कसाराकडे येत असताना उंबरमाळी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान राजाबाबू यांची पत्नी रुमा यांना प्रसुतीकळा सुरू झाल्या. गाडीतील महिला सहप्रवाशांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

तोपर्यंत कसारा रेल्वे स्थानक आले. कसारा स्थानकात उतरून राजाबाबूंनी कसारा रेल्वे पोलिसांना मदतीसाठी विनंती केली. कर्तव्य बजावत असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल येवले, महिला पोलीस कर्मचारी पूनम हाबळे, रेल्वे सुरक्षा बलच्या महिला कर्मचारी स्वाती मेश्राम यांनी तात्काळ गीतांजली एक्स्प्रेसमधील गरोदर मातेकडे धाव घेतली. तोपर्यंत प्रसूती झाली होती. महिला पोलिसांनी वेळीच दक्षता घेत या महिलेला रेल्वे डब्यातून सुखरूप खाली उतरवले.

प्रसूती झालेल्या महिलेच्या मदतीसाठी कसारा रेल्वे स्थानकाजवळील देऊळवाडी येथील अंजना डोंगरे, भागीरथी भगत, कविता डोंगरे, मोहिनी भगत, पार्वती डोंगरे या महिलांनी तात्काळ कसारा रेल्वे स्थानकात धाव घेतली. त्यानंतरही महिला आणि बाळाची काळजी घेतली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका खासगी गाडीतून महिला आणि बाळाला तात्काळ कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देवेंद्र वाळुंज यांनी महिलेवर तात्काळ उपचार सुरू केले. माता व बाळ यांची प्राथमिक तपासणी व उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

- Advertisement -

प्रसंगावधान राखीत रेल्वे पोलिसांनी स्थानिक महिलांची मदत घेऊन प्रसूत महिलेची आणि बाळाची सुखरूप सुटका करून तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
– वाल्मिक शार्दूल, पोलीस निरीक्षक, कल्याण लोहमार्ग

धावत्या रेल्वेमध्ये प्रसूती झालेल्या महिलेची व बाळाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर प्रसूतीनंतरचे सर्व उपचार करण्यात आले आहे.
– डॉ. देवेंद्र वाळुंज, वैद्यकीय अधिकारी. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -