Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे शहापुरात शासकीय धान्य गोदामाची दुरावस्था

शहापुरात शासकीय धान्य गोदामाची दुरावस्था

इलेक्ट्रॉनिक वजन काटा बंद असून त्यांची वाताहात झाली आहे. दांडी काट्याच्या साहाय्याने कारभार सुरु आहे. पारंपारिक यंत्रणेमुळे व गोदामाच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या नसल्याने उंदीर, घुशींचा आणि मोकाट डुक्करांचा गोदामात वावर असल्याने साठवलेल्या धान्याची प्रचंड नासाधूस होत आहे.

Related Story

- Advertisement -

 

 

- Advertisement -

शहापूर तालुक्यातील १६७ सरकारमान्य रेशनिंग दुकानांना तांदूळ, गहू, साखर, डाळ या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील शासकीय गोदामाची दुरवस्था झाली आहे. पुरवठा निरक्षक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे गोदामाची देखभाल दुरुस्ती अभावी प्रचंड पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे. गोदामाचे बांधकाम जीर्ण झाल्याने भिंतीची पडझड झाली आहे हे शासकीय गोदाम अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे . शहापूर शहरातील शासकीय धान्य गोदामातुन तालुक्यातील शहापूर, वासिंद, खर्डी, किन्हवली, डोळखांब, कसारा या परिसरातील शासनमान्य रेशनिंग धान्य परवानाधारक दुकानांना धान्य वितरीत केले जाते. एकूण १५०० मॅट्रीक टन धान्य मालाची साठवणूक येथे केली जात आहे. तीन एकर जागेत ही प्रत्येकी ५०० मेट्रीक टनची ३ सरकारी धान्य गोदामे येथे बांधण्यात आलेली आहेत. परंतु वेळोवेळी गोदामाच्या बांधकामाची देखभाल, दुरुस्ती व डागडुजी न ठेवण्यात आल्याने गोदाम इमारतीचे बांधकाम आता जीर्ण झालेले लाद्या उखडून उध्दवस्त झालेल्या दिसत आहेत.

विशेष म्हणजे पावसाळ्या पुर्वी देखील येथील अत्यावश्यक डागडुजी करण्यात आलेली नाही. गोदामांना संरक्षण भिंत किंवा कुंपण नसून येथील गोदाम सुरक्षा रामभरोसे आहे. इलेक्ट्रॉनिक वजन काटा बंद असून त्यांची वाताहात झाली आहे. दांडी काट्याच्या साहाय्याने कारभार सुरु आहे. पारंपारिक यंत्रणेमुळे व गोदामाच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या नसल्याने उंदीर, घुशींचा आणि मोकाट डुक्करांचा गोदामात वावर असल्याने साठवलेल्या धान्याची प्रचंड नासाधूस होत आहे. शासकीय धान्याची उचल -ठेव करण्यासाठी एकूण २१ हमाल येथे कार्यरत असून गोदाम इमारतीत पुरेसा सुविधा नसल्याने हमालांना अनेक असुविधांना समोरे जावे लागत आहे. यामुळे मजूर , हमाल त्रस्त झाले आहेत. हमाल मजुरांना येथे साधे प्रसाधनगृह देखील नाही, अशी अवस्था आहे. एकंदरीतच गोदामाची इमारत कालबाह्य झाली असून येथे नवीन संपूर्ण सुविधायुक्त गोदाम इमारत बांधणे गरजेचे आहे. अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. शासकीय गोदामांच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत अधिक माहिती व प्रतिक्रिया घेण्यासाठी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी देवाजी चौधरी यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisement -

शासकीय गोदामाची दुरुस्ती ची कामे करण्यासाठी ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या करता निधी मिळावा म्हणून दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला जानेवारी महिन्यात सादर केलेले आहे. निधी मिळताच शासकीय गोदामाची अत्यावश्यक कामे हाती घेतली जातील.
– डी. बच्छाव, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शहापूर

शासकीय गोदामाची दुरवस्था पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ गोदामाची अत्यावश्यक दुरुस्ती आणि डागडुजीची कामे करावीत, असे पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहापूर यांना देण्यात आलेले आहे.

– एस. व्ही. भगत गोदामपाल, शहापूर, पुरवठा विभाग

- Advertisement -