घरठाणेबदलापूरला मिळणार ५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी

बदलापूरला मिळणार ५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी

Subscribe

अमृत टप्पा दोनची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश

अंबरनाथ शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून जीवन प्राधिकरणाला ४ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला असतानाच आता बदलापूर शहरासाठीही अतिरिक्त ५ दशलक्ष लीटर पाणी देण्याचे संकेत जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.

शहरातील पाणी योजनांचा आढावा घेण्यासाठी अंबरनाथमध्ये आले असताना त्यांनी हे संकेत दिले. अंबरनाथ आणि बदलापूर शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत पाणी पुरवठ्याची यंत्रणा मात्र सक्षम झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे गेल्या दशकभरापासून या दोन्ही शहरांमध्ये पाणी प्रश्न गंभीर रूप घेऊ लागला आहे. अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे काम सुरू असल्याने नुकतेच धरण रिकामे केले गेले. त्यामुळे उद्भवलेली तुट भरून काढण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून चार दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी घेण्यात आले. त्याचा फायदा लवकरच अंबरनाथकरांना होईल.

- Advertisement -

बदलापूर शहरात वाढणारी लोकसंख्या आणि पाणी वितरण यंत्रणा यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे पूर्वेतील शिरगाव, आपटेवाडी या ५० ते ७० हजार लोकसंख्येच्या भागात पाण्याची कायम टंचाई असते. त्यामुळे या भागात अतिरिक्त पाणी द्यावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींची आहे. बदलापूर पश्चिमेतही अशीच अतिरिक्त पाण्याची मागणी होते आहे. या मागणीला दुजोरा देत उल्हास नदीतून बॅरेज बंधाऱ्यातून अतिरिक्त ५ दशलक्ष लिटर पाणी उचलण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी संमती दर्शवली आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार यातील ३ दशलक्ष लीटर पाणी पूर्व भागासाठी तर २ दशलक्ष लीटर पाणी पश्चिम भागासाठी देण्याचे संकेत निंबाळकर यांनी दिले आहेत. अंबरनाथ, बदलापूर शहरातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच त्यांनी या शहरांना भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले. या अतिरिक्त पाण्यामुळे बदलापूर शहरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

अमृत योजनेची कामे तातडीने मार्गी लावा
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने होऊ घातलेली अमृतच्या विविध टप्प्यातली कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकरांनी दिले आहेत. बदलापुरात जलकुंभांची उभारणी आणि वाहिन्या टाकण्यात दिरंगाई झाल्याने पाण्याचे आरक्षण असूनही पाणी उचल करता येत नाही. तसेच जलशुद्धीकरण केंद्रही वेळीच पूर्ण न झाल्याने पाण्याची उपलब्धता असतानाही ते नागरिकांना पुरवठण्यात अडचणी येत आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -