घरठाणेशिवमार्केट परिसरात गुजराती भाषेत बॅनर

शिवमार्केट परिसरात गुजराती भाषेत बॅनर

Subscribe

भाजपाकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

पूर्वेतील शिवमार्केट प्रभागात भाजपच्या वतीने गुजराती भाषेत बॅनर लावण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रभागातील हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हे बॅनर झळकावित येत्या निवडणुकांत जैन आणि गुजराती समाज बांधवांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? अशी चर्चा रंगू लागली आहे.

विकासाची कामे न केल्यामुळे निवडणूकीत कोणता मुद्दा घेऊन जाणार असा प्रश्न असल्यामुळे अशी बॅनरबाजी केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. डोंबिवली पूर्वेतील शिवमार्केट प्रभागात भाजपच्या नगरसेवकाने चक्क गुजरातीत बॅनर लावण्यात आले आहेत. येणाऱ्या काही महिन्यात कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लागू शकते. त्यामुळे मतदारांना विविध कार्यक्रम घेऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु झालेला आहे.

- Advertisement -

शिवमार्केट प्रभागात भाजपच्या नगरसेवकातर्फे गुजराती भाषेत बॅनर लावून जैन मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे का. अशी चर्चा शिवमार्केट प्रभागात रंगू लागली आहे. डोंबिवली ही सांस्कृतिक उपराजधानी आणि मराठी भाषेचा अभिमान असलेली नगरी मानली जाते. मात्र काही वर्षापासून डोंबिवलीमध्ये इतर भाषिक नागरिकांची वस्ती वाढत असून त्यामध्ये गुजराती भाषिकांचा टक्का वाढू लागल्याने या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी गुजराती भाषेत बॅनर लावित त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षातून झाला आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर डोंबिवलीत भाजपतर्फे गुजराती भाषेत बॅनर लावण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गुजराती भाषेतील बॅनर लावण्यामध्ये शिवसेना आणि मनसेही मागे राहीलेली नाही.

आपण जर पाहिले तर शिवमार्केट प्रभागात गेल्या पाच वर्षात फारशी विकासकामे झालेली दिसत नाहीत. रस्त्यावर खड्डे कायम आहेत. आगरकर रोड परिसरात जागोजागी कचरा पडल्याचे अनेकवेळा दिसून येते. याबाबतच्या तक्रारीसुद्धा नागरिकांकडून केल्या गेल्या आहेत. तर एकाच रस्त्याचे दोनदा भूमीपूजन करुनसुद्धा रस्त्याचे सीमेंट कॉंक्रीटीकरण अद्याप केले गेलेले नाही. असेही स्थानिक नागरिक सांगत आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षात प्रभागात फारसा बदल झालेला नाही हे दिसून येते. शिवमार्केट प्रभागातील फेरिवाला प्रश्न सुद्धा जैसे थे आहे. साऱ्या समस्या जैसे थे असताना निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजराती भाषेत बॅनर लावले जात असल्याची चर्चा ही नागरिकांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -