कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पाला आग

आगीच्या झळा प्रक्रिया केंद्राला लागल्याने प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले.

कल्याण पश्चिमेतील बारावे येथील गेल्या चार वर्षापूर्वी सुरू केलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. प्रक्रिया केंद्राभोवतीचा उन्हाने तप्त झालेला सुका कचरा आगीत जळून खाक झाला. आगीच्या झळा प्रक्रिया केंद्राला लागल्याने प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कचरा एकाच ठिकाणी न ठेवता, त्याची प्रभागवार पध्दतीने विल्हेवाट लावावी या उद्देशातून प्रशासनाने शहराच्या विविध भागात बारा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामधील पाच ते सहा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. बारावे प्रकल्प पूर्ण क्षमतेने घनकचरा विभागाकडून चालविला
जातो. कल्याण पश्चिमेतील सुका कचरा येथे आणला जातो. सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करून खत तयार केले जाते. आधारवाडी कचराभूमी सारखे या केंद्रात मोठे कचर्‍याचे ढीग नाहीत. तरी आग लागल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बारावे परिसरातील रहिवासी गाढ झोपेत होते. यावेळी गुरुवारी रात्रीबारावे कचराभूमीला आग लागली. कचर्‍याचा धूर परिसरातील नागरी वस्तीत पसरला. बारावे कचराप्रक्रिया केंद्राला आग लागल्याने
जागरूक रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन केंद्राला संपर्क केला. दोन बंब घटनास्थळी आले. त्यांनी अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत कचरा, प्रकल्प केंद्राचे नुकसान झाले आहे. अशी माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.