शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन व्यापारी गाळ्यांना गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत गाळ्यामधील महत्वाच्या कागदपत्रांसह किमान 50 लाखाचे कृषी साहित्य जाळून खाक झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला असून पाण्याचे खाजगी टँकर्स आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. दरम्यान, शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून अधिक तपास शहापुर पोलीस करीत आहेत.
शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या व्यापारी संकुलातील राहुल निमसे यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या दोन गाळ्यांना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. याबाबत माहिती मिळताच शहापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे खाजगी टँकर्स पाचारण केले व स्थानिक नागरिकांच्या तसेच जीव रक्षक दलाच्या मदतीने एक तासात आग आटोक्यात आली. रात्रीची वेळ असल्याने व बाजार संपला असल्याने सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसून या गाळ्यांच्या वरतीच दुय्यम निबंधक कार्यालय आहे मात्र वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या भीषण आगीत दोन्ही गाळ्यातील निमसे यांचे शेतीसाठी लागणारी अवजारे, औषधे, बी बियाणे व महत्वाची कागदपत्रे असे सुमारे 50 लाखाचे कृषी साहित्य जळून खाक झाले असल्याचे गाळा धारक निमसे यांनी सांगितले. दरम्यान, शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून शहापुर पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.