भिवंडी । बांगलादेशात भारतीयांवर होणारे अन्याय, अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच भिवंडीत अवैधपणे घुसखोरी करून भाड्यावर राहणार्या बांगला देशींवरील कारवाई पोलीस प्रशासनाने तीव्र केली आहे. शहरात मागील सोळा दिवसात सर्चिंग ऑपरेशनद्वारे जवळपास १९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. आर्थिक टंचाई, शिक्षणाचा अभाव आणि प्रचंड बेरोजगारी यामुळे बांगलादेशातील नागरिकांवर बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट कोसळले आहे. आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी येथील अनेक बांगलादेशी नागरिक बांगलादेशातून पळ काढून छुप्या मार्गाने भारतात दाखल होतात. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी नागरिकांकडे भारतात येण्यासाठी आवश्यक पारपत्र तसेच परवाना तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र या सर्व शासकीय नियमांना बगल देऊन केवळ दलालाच्या मध्यस्थीने छुप्या तसेच अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात येतात. या दलालांच्या मदतीने पुढे भारतातील विविध कानाकोपर्यात वास्तव्य करतात. कामाच्या शोधात आलेले हे बांगलादेशी नागरिक बहुतेक करून राज्यातील मुस्लिम बहुल भागांसह दाटीवाटी असलेल्या ग्रामीण भागातील गावांमध्ये देखील राहतात. शहरात अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. अवजड काम तसेच बांधकाम क्षेत्रात मजुरी, डाइंग सायजिंगमध्ये बॉयलर अटेंडंट तसेच प्लंबिंगचे काम करून भिवंडीतील अनेक ठिकाणी चाळींमध्ये हे नागरिक आपली ओळख लपवून राहतात.
शहरात २०२३ मध्ये १३ हुन अधिक तर २०२४ च्या डिसेंबर महिन्यात १९ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बहुसंख्य बांगलादेशी हे मजुरी तसेच प्लम्बिंगच्या कामासाठीच भिवंडीत आले असल्याचे तपासात पुढे आले आहे. कायदेशीर नियमानुसार अटक केलेल्या या बांगलादेशी नागरिकांना दोन ते तीन महिने तर कधी कधी न्यायालयीन प्रक्रिया आमि पोलीस तपासात लागणार्या विलंबामुळे बांगलादेशींना एक वर्षापर्यंत तुरुंगात ठेवले जाते. त्यांनतर प.बंगाल येथील भारत आणि बांगलादेशाच्या बॉर्डरवर सोडून त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठविले जाते.ज्याची पोच पावती बांगलादेशच्या पोलिसांकडून घेणे पोलिसांसाठी महत्वाचे असते.
भारतात सोडण्यासाठी दलाल घेतात ५ ते ७ हजार रुपये
भिवंडीत अवैध राहत असलेले बांगलादेशी नागरिक दलालाला पाच ते सात हजार रुपये देऊन भारतात पाठवले जातात. हेच दलाल दलाल त्यांच्यासाठी भारतातील पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इतर बोगस कागदपत्रे तयार करून देतात.तर बारमध्ये काम करणार्या बांगलादेशी तरुणींकडून १० ते १५ हजार हे दलाल घेत असतात. पश्चिम बंगालच्या सीमेवरून घुसखोर भारतात येतात. बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. तर भारतातील पश्चिम बंगालच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये बोलली जाणारी बोली भाषा ही बांगलादेशी नगरिकांसारखीच आहे. अनेक बांगलादेशी नागरिकांचे नातेवाईक देखील या सीमेलगतच्या गावांमध्ये सारखीच असल्याने या गावांमधूनच हे नागरिक भारतात येत असतात.
पोलिसांवर कामाचा ताण
सध्या वरिष्ठांच्या आदेशाने शहरातील बांगलादेशी नागरिकांवरची कारवाई सक्त केली असल्याने पोलीस यंत्रणा बांगलादेशी नागरिकांच्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये व्यग्र आहे. ज्यामुळे शहरात घडणारे दरोडा, घरफोडी व इतर गुन्ह्यांच्या तापासकडे दुर्लक्ष होत असून खबर्यांमार्फत बांगलादेशी नागरिकांच्या सर्चिंग ऑपरेशनकडे संपूर्ण लक्ष लागले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
भिवंडीत राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येते मागील काही दिवसांपासून हि मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मात्र अटक केलेले हे बांगलादेशी नागरिक देशविघातक कृत्याशी संबंधित आहेत किंवा नाही हा तपासाचा भाग आहे. तरी असामाजिक तत्वांशी त्यांचा संबंध असून बेकायदेशीर शहरात रहाणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने यापुढेही शहरात अवैध राहणार्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांनी दिली आहे.