शहरात दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी चार वाजता झालेल्या एक तासाच्या मुसळधार पावसाने भिवंडीतील रस्ते चिखलमय झाले असून नागरिकांना रस्त्यावर चालणे कठीण झाले. शहरातील गटारे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून नियमित साफ होत नसल्याने आणि रस्त्यावरील पाणी गटारात जाण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी साचून ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाले आहे. शहरातील जवळजवळ सर्वच रस्त्यावर खड्डे झाले असून पालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने ते खड्डे न भरल्याने खड्ड्यात पाणी साचले होते. शहरातील बाजारपेठ आणि भाजीमार्केटमधील रस्त्यावर नियमित झाडू न मारल्याने तेथील रस्त्यावरील कचऱ्यावर पाणी साचून चिखल साचल्याने खरेदीदारांची चिखलामधून वाट काढण्यासाठी कसरत करावी लागली. तर शहरातील नादुरुस्त रस्त्याची स्थिती भयंकर झाल्याने नागरिकांनी रिक्षामध्ये बसून प्रवास केल्याने त्यांना भुर्दंड सहन करावा लागला आहे. एक महिन्यावर पावसाळा आला असून महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी करण्याची कामे सुरु करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
- Advertisement -
- Advertisement -