दि.बां.च्या नावासाठी विमानतळ परिसरात भूमिपूत्र निर्धार परिषद

चोविस जानेवारीला थेट 'विमानतळ कामबंद आंदोलन'

नवी मुंबईतील आंंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी विमानतळ परिसरातच, येत्या १३ जानेवारीला हजारो प्रकल्पग्रस्त-भूमिपूत्रांंची ‘भव्य भूमिपूत्र निर्धार परिषद आणि २४ जानेवारीला थेट ‘विमानतळ कामबंद आंदोलन’ पुकारण्यात येणार असल्याचा इशारा, ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती’चे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी दिला आहे.

नवी मुंबईतील आंंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त, भूमिपूत्रांंची ‘भव्य भूमिपूत्र निर्धार परिषद’, दि.बा.पाटील यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ जानेवारीला पनवेल येथील विमानतळ परिसरातील, कोल्ही कोपरगाव, दत्त मंदिर येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेत, भूमिपुत्रांच्या औद्योगिकीकरणासाठी-एमआयडीसीसाठी-मफतलाल कंपनीसाठी घेतलेल्या जमिनींचा प्रश्न, गावठाण जमिनींचा प्रश्न, रेतीबंदर जमिनी व व्यावसायिकांचे प्रश्न, इतर प्रलंबित जमिनींचा प्रश्न, भूमीपुत्रांच्या बेरोजगारीचा प्रश्न आदींवर चर्चा होऊन भविष्यात याबाबतील ठोस कार्यक्रम हाती घेऊन रेकॉर्डब्रेक आंदोलन हाती घेण्यात येईल तसेच २४ जानेवारीला ‘विमानतळ कामबंद आंदोलन’ पुकारण्यात येणार असल्याची घोषणा ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी केली.