बिहारमधील सराईत गुन्हेगाराला नाशिकमधून अटक

१२ वर्षांपासून फरार असणारा बिहार राज्यातील सराईत गुन्हेगार करुद्दीन अमीरहुसेन उर्फ समीरुद्दीन अन्सारी याला नाशिक शहरातून अटक करण्यात आली आहे.

अनेक चोर चोरी करूनही कितीतरी वर्षे असेच मोकाट फिरत असतात. असाच एक प्रकार नाशिकमधून समोर येत आहे. १२ वर्षांपासून फरार असणारा बिहार राज्यातील सराईत गुन्हेगार करुद्दीन अमीरहुसेन उर्फ समीरुद्दीन अन्सारी याला नाशिक शहरातून अटक करण्यात आली आहे. यासंबंधिची कारवाई ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने बिहार पोलिसांच्या सोबत केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचा ताबा बिहार पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

कमरुद्दीन उर्फ समीरुद्दीन अन्सारी हा बिहार राज्यातील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, स्फोटके बाळगणे, दरोडा या सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. १२ वर्षांपूर्वी त्याला बिहार पोलिसांनी त्याला अटक केली होती, त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. बाहेर आल्यानंतर नाशिक येथे मुलाबाळांसह स्थायिक झाला होता. बिहार न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याला कमरुद्दीन हा मागील १२ वर्षांपासून हजर राहत नसल्यामुळे न्यायालायाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. कमरुद्दीन हा नाशिक येथे राहत असल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळताच बिहार पोलिसांनी ठाणे पोलिसांची मदत घेतली. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक बिहार पोलिसांसह नाशिक येथे रवाना झाले. त्यांनी सिडको कॉलनी, पंडित नगर येथून कमरुद्दीन उर्फ समीरुद्दीन अन्सारी याला अटक करून बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कमरुद्दीन हा मागील १२ वर्षांपासून नाशिक येथे पत्नी आणि मुलासह राहत होता. सिडको कॉलनी येथे त्याने स्वतःचे घर घेऊन नाशिकमध्येच त्याने जुनी वाहने खरेदी व विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता अशी माहिती गुन्हे शाखेचे सपोनि, प्रफुल्ल जाधव यांनी दिली आहे.


हेही वाचा – ३० हजारांची लाच घेताना नगर परिरक्षक भूमापक अधिकारी अटक