घरठाणे'ठाण्यात ४५० कोटींचे धरण २० हजार कोटींवर गेले'; भाजपाची टीका

‘ठाण्यात ४५० कोटींचे धरण २० हजार कोटींवर गेले’; भाजपाची टीका

Subscribe

ठाणे महापालिकेने स्वतंत्र धरण उभारण्याची २००३ मध्ये सुवर्णसंधी गमावल्यानंतर झोपी गेलेल्या शिवसेनेला आता पुन्हा जाग आली आहे, अशी खरमरीत टीका भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली. २००३ मध्ये स्वतंत्र धरण नाकारल्यानंतर, जुलै २०१६ मध्ये पुन्हा स्वतंत्र धरणाच्या सत्ताधारी शिवसेनेने डरकाळ्या फोडल्या होत्या. मात्र, आता पुन्हा चार वर्षांनंतर धरणासाठी `फुकाची बडबड’ केली जात असून, कृती शून्य आहे, अशी टीका नारायण पवार यांनी केली.

राज्यात कोठे धरणे असावीत, याबाबत चितळे किंवा गोडबोले समितीने अहवाल दिला होता. त्यावेळी ठाणे ही नगर परिषद असल्याने शाई धरण मुंबईला देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात हे धरण ठाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही धरणाला मंजुरीही दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शाई धरण विकत घ्यावे, असे सत्ताधारी शिवसेनेला सुचविले होते. त्यावेळी फक्त ४५० कोटी रुपयांत धरण मिळत होते. तर या धरणाच्या सर्वेक्षणासाठी ठाणे महापालिकेने २००७ मध्ये ७१ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, ठाणे महापालिकेने धरणाबाबत गांभीर्याने भूमिका घेतली नव्हती. त्यानंतर एका अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूदही केली होती. मात्र, धरण घेण्याऐवजी एमएमआरडीएने धरणाचे काम करण्याचे सुचविले होते, याकडे भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

२०१६ मध्ये राज्य सरकारकडे ठाणे महापालिकेने १९० कोटी रुपये जमा केले, तर हे धरण ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार होते. मात्र, या संदर्भात शिवसेनेने काहीही हालचाली केल्या नव्हत्या. २०१६ च्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांकडून स्वतंत्र धरणाबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. त्यातही गांभीर्याने प्रयत्न न करता `फुकाची बडबड’ करण्यात आली, अशी टीका ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली.

ठाणे महापालिकेवर शिवसेनेने २५ वर्ष वर्चस्व आहे. मात्र, त्यांना धरणाचा प्रश्न सोडविता आला नाही. महापालिका निवडणुकीच्या २०१७ च्या शिवसेनेच्या वचननाम्यातही स्वतंत्र धरणाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत साडेतीन वर्षांत काहीही हालचाली झालेल्या नाहीत, असे नगरसेवक नारायण पवार यांनी नमूद केले. २००४ मध्ये ४५० कोटींचे धरण २०१२ मध्ये १४०० कोटींवर पोचले. आता २०२० मध्ये धरणासाठी कोट्यवधींचा खर्च वाढणार आहे, याला जबाबदार कोण, असा सवाल श्री. पवार यांनी केला आहे. प्रत्येक ठाणेकराला पुरेसे पाणी मिळण्याचा हक्क आहे, असे नारायण पवार यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

‘आता तरी जितेंद्र आव्हाडांचे ऐका’

यापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची राजवट असताना शाई धरणाबाबतची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सूचना शिवसेनेने नाकारली होती. आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले आहेत. सध्या एकाच मंत्रिमंडळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड मंत्री आहेत. त्यामुळे आता तरी मंत्री आव्हाड यांची सूचना ऐकावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -