घरठाणेठाण्यात भाजपची 'वॉर अगेन्स्ट टॅंकर माफीया' मोहीम

ठाण्यात भाजपची ‘वॉर अगेन्स्ट टॅंकर माफीया’ मोहीम

Subscribe

जवळपास ६०० गृहसंकुलांना टँकरमार्फत पाणी पुरवठा केला जात असल्याने ही वाढती लॉबी वेळीच मोडीत काढण्यासाठी ठाणे शहर भाजप आक्रमक

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदर रोडच नव्हेतर शहरातील इतर भागातही आता टँकर माफियांची लॉबी वाढू लागली आहे. जवळपास ६०० गृहसंकुलांना टँकरमार्फत पाणी पुरवठा केला जात असल्याने ही वाढती लॉबी वेळीच मोडीत काढण्यासाठी ठाणे शहर भाजप आक्रमक झाली आहे. त्यांनी याच्या विरोधात ‘वॉर अगेन्स्ट टॅंकर माफीया’ ही मोहीम हाती घेतली आहे. तसेच येत्या काही दिवसात ‘पाणी एल्गार परिषदेचे’ आयोजनही करण्यात आले असून यात समस्याधारक गृहसंकुले यात सहभागी होणार असल्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तर टँकर माफियांना पोसण्याचे काम सत्ताधारी शिवसेना करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ठाण्यातील घोडबंदर परिसरात पाणी व अन्य मुलभूत सुविधांची कमतरता असतानाही ठाणे महापालिकेद्वारे नवीन बांधकामांना परवानग्या दिल्या जात असल्याने येथील रहिवाशांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची बिले भरूनही पाणी टंचाईमुळे येथील गृहसंकुलांना लाखो रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च करावे लागत आहेत. याविरोधात घोडबंदर परिसरील रहिवासी मधु नारायणन उन्नी यांनी मुंबई उच्च न्यायालयातील वकिल ॲड.सुरीन उसगांवकर यांच्यामार्फत ठाणे महापालिका आयुक्तांना ११ ऑक्टोबर २०१७ चा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश दुर्लक्षीत केल्याबद्दल जानेवारीत नोटीस बजावली होती. या कायदेशीर नोटीशीला उत्तर देताना पालिकेने सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. दरम्यान वॉर अगेंस्ट टँकरमाफिया या लोक चळवळीला घोडबंदर भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला असून यात सामाजिक संस्था, संघटनांचा लक्षणीय सहभाग मिळत आहे.

- Advertisement -

सोमवारी आमदार केळकर यांनी महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून देखील अपेक्षित असे उत्तर मिळू शकलेले नाही. त्यातही मागील काही दिवसात केलेल्या एका सर्व्हेक्षणात शहरातील सुमारे ६०० गृहसंकुलांना आजही टॅंकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यातही, घोडबंदर भागतील २५० गृहसंकुलांना टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. घोडबंदरला सध्या ८३ दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. परंतु वाढीव १० दशलक्ष पाणी पुरवठा केव्हा मिळणार याचे उत्तर पालिकेकडे नाही. त्यातही एका टॅंकरसाठी १२०० ते १५०० रुपये गृहसंकुलांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे पाणी नाही तर बील कशासाठी घेता असा सवाल केळकर यांनी उपस्थित केला आहे.

पाणी टंचाईविरोधात दिव्यात आंदोलन
दिवा शहरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपा दिवा शहर मार्फत येत्या २४ फेब्रुवारीला दिवा टर्निंग येथे वॉटर मीटर गटर अशा स्वरूपाचे निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -