धावत्या टँकरमधून अॅसिड दोघे किरकोळ जखमी

एक दुचाकी जळाली

श्रीराम चौकाच्या मार्गे तळोजाला जाणाऱ्या टँकरमधून सल्फ्युरिक अॅसिड उडाल्याने त्यात तीन जण किरकोळ होरपळले. तर एक मोटरसायकल जळाल्याची घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सल्फ्युरिक अॅसिडने भरलेला टँकर श्रीराम चौकातील स्पीडब्रेकरवर आदळला. टँकरचे झाकण सैल असल्याने त्यातील अॅसिड उडाले. त्यात चौकातून घरी जाणारे भरत वसीटा, कुणाल वसीटा आणि दिलीप पुरस्वानी हे किरकोळ होरपळले.’

तर बाजूला उभी असलेली मोटरसायकल जळाली. भरत आणि कुणाल वसीटा यांच्यावर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले. दिलीप पुरस्वानी यांना गुणगीत या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून टँकर चालक राकेश राणा याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.