कल्याणमध्ये विजेचा धक्का बसून मुलगा जखमी

Child laborer dies after electric shock in Bhiwandi
 कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात महावितरणच्या रोहित्रामधील जिवंत वीज वाहिनीचा धक्का बसून एक १२ वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. सोनूू राम असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चक्कीनाका भागात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाची देखभाल मेघनाथ राम करतात. पैसे द्या आणि स्वच्छतागृह वापरा तत्वावर हे गृह चालविले जाते. मेघनाथ आपल्या कुटुंबीयांसह स्वच्छता गृहाच्या गच्चीवर राहतात. स्वच्छता गृहालगत महावितरणचे रोहित्र आहे.
या रोहित्राच्या वीज वाहिन्या स्वच्छतागृहाला खेटून आहेत. रविवारी दुपारी मेघनाथ यांचा मुलगा सोनू गच्चीवर खेळत असताना त्याचा धक्का जिवंत वीज वाहिनीला लागला. त्याला जोराचा झटका बसून तो गंभीररित्या भाजला. त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला तात्काळ डोंबिवली एमआयडीसीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनूची प्रकृती स्थिर असून तो उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. रोहित्राजवळ कल्याण डोंबिवली पालिकेने स्वच्छतागृह बांधलेच कसे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.