‘त्या’ 15 हजार लोकांमुळे इतरांवर भार

टोरंट पॉवर कंपनीची माहिती

electricity
electricity

कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात टोरंट पॉवर कंपनीने वीज चोरांविरोधात जोरदार मोहीम सुरू केल्यापासून या परिसरात होत असलेल्या वीज चोरीच्या प्रकारात मागील 2 वर्षात घट झाल्याचे दिसून आले आहे. नवीन मीटर लावणे, कायम स्वरूपी मीटर बंद झालेल्या पीडी ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना सारख्या योजनांची सुरूवात या परिसरात करून अदयापही 15 हजारांवर घरे मीटरशिवाय बेकायदेशीरपणे वीज वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात सव्वा तीन लाखावर वीज ग्राहक असून मार्च 2020 साली जेव्हा टोरंट पॉवरने फ्रँचाईझी म्हणून याभागाचा कारभार हाती घेतला तेव्हा या क्षेत्रातील वीज गळती व नुकसानीचे प्रमाण 50 टक्केपेक्षा जास्त होते.

टोरंट कंपनीने केलेल्या उपायांमुळे गळती थोडी कमी झाली असली तरी, अजुनही काही प्रमाणात राहिलेली आहे. ग्राहकांना सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा मिळावा यासाठी टोरंट पॉवर कंपनीने सातत्याने प्रयत्न केले. नवीन उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे जाळे परिसरात पसरवले. ग्राहकांना वीज वापराची अचूक नोंद दाखवणारे नवीन मीटर बसवण्यात आले. नवीन रोहीत्र, आरएमयु बसवण्यात आले. यामुळे ग्राहकाना अखंडीत वीज पुरवठा होऊ लागला. तसेच ज्यांचे मीटर महावितरणच्या काळात पीडी ( कायमस्वरूपी बंद) झालेले आहेत अश्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून त्यांचा वीज पुरवठा सुरळित करून घेतला.

असे असतानाही काही ग्राहक अद्यापही वीज बेकायदेशीररीत्या मीटर न लावता वापरत असल्याचे आढळून आले आहे. असे करणे म्हणजे वीज चोरी असून हा कायद्याने गुन्हा आहे. वीज कायदा 135 व 138 अंतर्गत वीज चोरीबद्दल कायदेशीर कारवाई होऊन दंड व अटक देखील होते. टोरंट पॉवरच्या भरारी पथकाद्वारे अनेक ठिकाणी धाड घालून वीज चोरी करण्यांवर कायदेशीर कारवाई केली. असे असूनही 15 हजार घरे आजमितीस मीटरशिवाय वीज वापरत आहेत. या गैरकायदेशीर वापरामुळे नियमित वीज बिल भऱणा करीत असलेल्या ग्राहकांवर अन्याय होत आहे. वीज चोरी करणारे अनधिकृतपणे वीज केबलमध्ये, मीटरमध्ये छेडछाड करत असल्याने वीज पुरवठामध्ये व्यत्यय येतो. वीज चोरी करताना अपघात होऊन जीवही दगावू शकतो. टोरंट कंपनीने ग्राहकाना आवाहन केले आहे की, कळवा-मुंब्रा-दिवा परिसरातील जागरूक ग्राहकानी वीज चोरी बाबत ग्राहक कक्षाच्या हेल्पलाईन 1800 267 7099 किंवा 02522-241900 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.